नवी दिल्ली, 19 जून : राज्यसभेच्या 24 जागांसाठी शुक्रवारी (19 जून) मतदान झालं. अपेक्षेप्रमाणेच भाजपने बाजी मारत 11 जागा मिळवल्या, काँग्रेसला 05 जागांवर समाधान मानाव लागलं तर इतर पक्षांना 06 जागा मिळाल्या. मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानच्या निकालांकडे देशाचं लक्ष लागलेलं होतं. त्यापैकी मध्य प्रदेशात काँग्रेसला धक्का बसल्याचं दिसतं. राज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला किमान दोन जागा मिळतील, असा अंदाज होता. प्रत्यक्षात काँग्रेसला एकच जागा मिळवता आली आहे. भाजपने मात्र दोन जागा खिशात घातल्या आहेत. राजस्थानात मात्र तीन पैकी दोन जागा काँग्रेसने मिळवल्या आहेत, तर भाजपला एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. या निकालांमुळे भाजपला बळ मिळालं असून त्यांची राज्यसभेची ताकद वाढणार आहे. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे आणि सुमेर सिंह यांनी भाजपचा गड राखला आहे. काँग्रेसच्या केवळ दिग्विजय सिंह यांचाच विजय झाला आहे. आंध्र प्रदेशातल्या चारही जागा YRS काँग्रेसनी जिंकल्या आहेत. तर मणिपूरमध्ये पक्षांतरबदलाचं वारं वाहत असताना काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र तिथली एकमेव जागा भाजपने जिंकत बाजी मारली. राज्यसभेसाठी मतदान झालेली राज्य आणि मिळालेल्या जागा आन्ध्रप्रदेश 04 - सर्व जागा YSRCP मध्य प्रदेश 03 - 2 भाजप, 1 - काँग्रेस राजस्थान 03 - 1 भाजप, 2 काँग्रेस गुजरात 04 - 3 भाजप, 1 काँग्रेस कर्नाटक 04 - 2 भाजप, 1 काँग्रेस, जेडीएस 1 झारखंड 02 - 1 भाजप, 1 JMM मिजोरम 01 - 1 MNF मणिपूर 01 - 1 भाजप मेघालय 01 - 1 NPP अरुणाचल 01 - 1 भाजप काय आहे राज्यसभेचं गणित? सध्याच्या स्थितीत राज्यसभेत 224 खासदार आहे. तर 21 जागा रिकाम्या आहेत. 27 जूनपर्यंत एकूण 27 जागा रिकाम्या होतील. आज 19 जागांसाठी मतदान होईल तर 3 जागा नंतर भरल्या जातील. सध्याच्या स्थितीत सभागृहात एनडीएकडे 91 जागा आहेत. तर बिगर एनडीए आणि बिगर यूपीए खासदारांची संख्या 68 इतकी आहे. यूपीएकडे एकूण 61 खासदार असून त्यातील 39 खासदार काँग्रेसचे आहेत. आज होणाऱ्या निवडणुकीतनंतर भाजपचे 9 खासदार वाढले तर त्याचवेळी काँग्रेसचे 2 खासदार कमी झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







