जयपूर 14 ऑगस्ट: सचिन पायलट यांनी बंडखोरीची तलवार म्यान केल्याने राजस्थानमधलं काँग्रेसचं अशोक गेहलोत सरकार वाचलं आहे. विधानसभेत अविश्वासाच्या प्रस्तावावर चर्चा झाली आणि त्यानंतर ध्वनिमताने प्रस्ताव मंजूर झाल्याने काँग्रेसने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. शुक्रवारी विधानसभेचं अधिवेशन सुरु झाल्यानंतर भाजपने अविश्वासाचा प्रस्ताव आणला होता. मात्र बंड शमल्याने काँग्रेस सरकारला धोका नव्हता. आता सचिन पायलट यांना पुन्हा उपमुख्यमंत्री पद देणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी दिल्लीत चर्चा केल्यानंतर सचिन पायलट यांनी आपली तलवार म्यान केली होती. विश्वासमत मिळाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला राजस्थानमधला राजकीय पेच मिटला आहे.
The vote of confidence which was brought by the govt has been passed with a very good majority today in the #Rajasthan Assembly. Despite various attempts by the opposition, the result is in favour of govt: Congress leader Sachin Pilot pic.twitter.com/IwIX6OVidw
— ANI (@ANI) August 14, 2020
विरोधकांनी सरकार पाडण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र आम्हाला बहुमत असल्याचं सिद्ध झालंय. निकाल हा सरकारच्या बाजूने लागला अशी प्रतिक्रिया सचिन पायलट यांनी दिली आहे. सरकारच्या स्थापनेपासूनच सचिन पायलट हे नाराज होते. शेवटी त्यांनी बंडाचं हत्यार उपसलं होतं. मात्र त्यांना आमदारांचा पुरेसा पाठिंबा मिळाला नसल्याने त्यांनी तडजोडीचा प्रस्ताव मान्य केला. समर्थक आमदारांच्या भरवशावर सरकार पडणार नाही आणि भाजपनेही सावधपणे खेळी केल्याने पाहिजे ते साध्य होऊ शकत नाही असं दिसल्याने सचिन पायलट यांनी अखेर दिल्लीतून सूत्र हलवत आपलं काम फत्ते केलं.