नवी दिल्ली, 10 मे : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच झाल्या. त्यात केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीचीसुद्धा निवडणूक झाली. तिथल्या नवनियुक्त मुख्यमंत्र्यांनाच आता कोरोनाने घेरलं आहे. एन. रंगासामी (CM N Rangasamy) यांनी शुक्रवारीच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यांना आता कोरोनाची लागण (Corona Positive) झाली आहे. रविवारी त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रंगासामी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना चेन्नईच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असं राज्य आरोग्य विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले.
कोरोना विषाणूची सौम्य लक्षणे जाणवत असल्याने मुख्यमंत्री एन. रंगासामी यांची पद्दुचेरी येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात कोरोना तपासणी करण्यात आली आणि त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आरोग्य प्रवक्त्यांनी सांगितले की, सीएम रंगासामी यांची प्रकृती अद्याप स्थिर आहे. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चेन्नईच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.
रविवारी संध्याकाळी ते चेन्नईला रवाना झाले. दोन दिवसांपूर्वीच रंगासामी यांनी शुक्रवारी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्या वेळी आरोग्य विभागाकडून 183 जणांची तपासणी केली गेली, त्यापैकी 11 लोकांना कोरोना संसर्ग झाला असल्याचे आढळले आहे.
पद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात रविवारी कोविड - 19 च्या महामारीने एकाच दिवसात सर्वाधिक 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर कोरोनाची लागण झालेले 1633 नवीन रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार रविवारच्या बाधित लोकांच्या संख्येनंतर संक्रमित लोकांची संख्या वाढून 71 हजार 709 झाली आहे. यासह आणखी 26 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर या केंद्रशासित प्रदेशात मृतांचा आकडा 965 वर पोहोचला आहे.
हे वाचा - मंत्रिमंडळ शपथविधीनंतर ममता बॅनर्जी अडचणीत, जुन्या प्रकरणाची होणार चौकशी
देशाच जवळपास सर्वच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनची स्थिती बिकट आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून मृतांची संख्याही जास्त आहे. गेल्या काही दिवसांपासून काही राज्यांमधील कोरोना रुग्णसंख्या काहीशी घटली असली तरी मृतांची संख्या मात्र वाढतच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona updates, Coronavirus, Puducherry