नवी दिल्ली, 27 ऑगस्ट : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organization) अर्थात ‘इस्रो’ने गेल्या काही वर्षांतल्या आपल्या नेत्रदीपक कामगिरीने जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. उपग्रह निर्मिती, प्रक्षेपणासोबतच चांद्रयान, मंगलयान आदी प्रकल्पांमुळे ‘इस्रो’चं नाव जगभरात आदराने घेतलं जातं. ‘इस्रो’कडून उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या प्रक्षेपकांची निर्मिती आता प्रथमच खासगी कंपन्यांमध्येही होणार आहे. पोलर सॅटेलाइट लाँच व्हेइकल (Polar Satellite Launch Vehicle - PSLV) अर्थात ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या निर्मितीसाठी आता खासगी कंपन्यांना कंत्राट दिलं जाणार आहे. हे कंत्राट मिळवण्यासाठी अदानी ग्रुप (Adani Group), लार्सन अँड टुब्रो (Larson & Toubro) यांसारख्या मोठ्या कंपन्याही शर्यतीत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, हे कंत्राट पाच लाँच व्हेइकल्स बनवण्यासाठी असेल. न्यू स्पेस इंडिया लिमिटेड या सरकारी कंपनीने यासाठी प्रस्ताव (FRP) मागवले होते. त्याच्या उत्तरादाखल तीन खासगी कंपन्यांनी 30 जुलैपर्यंत स्वारस्यपत्र (Expression of Interest) दाखल केलं आहे. न्यू स्पेस इंडिया लिमिटेड अर्थात NSIL या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपनीची स्थापना मार्च 2019मध्ये झाली. तिचं प्रशासकीय नियंत्रण केंद्र सरकारच्या अंतराळ विभागाकडे आहे. भारतीय अंतराळ क्षेत्रातला देशांतर्गत उद्योगजगताचा सहभाग वाढवण्याची जबाबदारी या कंपनीकडे देण्यात आली आहे. त्यानुसार, NSIL ने पाच PSLV च्या निर्मितीसाठी स्वारस्यपत्रं मागवली होती. त्यामध्ये अनेक कंपन्यांनी रस दाखवला. त्यातल्या तीन कंपन्यांनी काही आठवड्यांपूर्वी आपली स्वारस्यपत्रं सादर केली आहेत. हे ही वाचा- केजरीवालांच्या भेटीनंतर सोनू सूद दिल्ली सरकारच्या विशेष कार्यक्रमाचा अॅम्बेसेडर भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) या कंपनीने स्वतंत्रपणे स्वारस्यपत्र सादर केलं आहे. हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि लार्सन अँड टुब्रो (L & T) या कंपन्यांनी कन्सॉर्शियम स्वरूपात म्हणजे एकत्रितपणे स्वारस्यपत्र सादर केलं आहे. तसंच, अदानी-अल्फा डिझाइन, BEL आणि BEML यांनीही एकत्रितरीत्या स्वारस्यपत्र सादर केलं आहे. या कंपन्यांनी पीएसएलव्हीच्या निर्मितीसाठी बोली लावल्यामुळे मेक इन इंडिया (Make In India) योजनेला बळ मिळणार असल्याचं अंतराळ विभागाने म्हटलं आहे. तसंच, यामुळे ‘इस्रो’चं बळ वाढणार असून, त्यामुळे ‘इस्रो’ दर वर्षी आणखी उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करू शकणार आहे. NSIL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन डी. यांनी सांगितलं, की तांत्रिक आणि आर्थिक मूल्यांकन सध्या सुरू असून, त्यानंतर आता आलेल्या बोली उघडल्या जातील. ही प्रक्रिया काही महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. सध्या याबाबत आणखी काही सांगू शकत नाही, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, टाइम्स ऑफ इंडियाने एका सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे, की हे कंत्राट चालू वर्षाच्या अखेरीपर्यंत दिलं जाऊ शकतं. ज्या उत्पादक कंपनीची निवड यासाठी केली जाईल, ती एक लायसेन्सप्राप्त निर्माती ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.