नवी दिल्ली, 14 ऑगस्ट : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला पहिल्यांदाच उद्देशून भाषण केलं. त्यांनी यावेळी भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांना वंदन केले. आज पुन्हा एकदा देशासाठी काहीतरी करण्याची वेळ आली आहे असं ते म्हणाले.
स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या पीढीचे कोविंद यांनी यावेळी आभार मानले. तसंच त्यांचा आदर्श पुढे ठेवून काहीतरी करण्याची आज आपल्याला गरज आहे असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी स्वच्छ भारत अभियानाचाही उल्लेख केला. सरकार कायदे बनवू शकतं त्यांना लागू करू शकतं पण त्या कायद्याचं पालन करणं ही सर्वांची जबाबदारी आहे असं आवाहनही कोविंद यांनी केलं.
यावेळी जीएसटी आणि नोटाबंदीच्या यशाचेही त्यांनी कौतूक केलं. नोटाबंदीच्या काळात लोकांनी धैर्यशीलतेचा एक नमुना जगासमोर ठेवला असंही ते म्हणाले. नोटाबंदीमुळे देशात सचोटीची प्रवृत्ती वाढली. जीएसटीचाही लोकांनी आनंदाने स्वीकार केला.
मोदींच्या न्यू इंडियाच्या स्वप्नाचाही त्यांनी उल्लेख केला आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण झटलं पाहिजे असंही ते म्हणाले.
राष्ट्रपतींच्या भाषणातले काही महत्तवाचे मुद्दे
- लहानपणची एक परंपरा त्यांना आठवली, घरातल्या मुलीच्या लग्नात सगळ्या माणसांचं योगदान असायचं
- सरकारच्या प्रयत्नांचा फायदा शेवटपर्यंत पोचण्यासाठी तर सगळ्यांचेच योगदान गरजेचं आहे.
- राष्ट्रनिर्माणासाठी येणाऱ्या पिढ्यांवर लक्ष केंद्रीत करणं सगळ्यात महत्त्वाचं.
- असा समाज हवा आहे जिथे मुलगा मुलगी, धर्म या गोष्टींवरुन भेदभाव होणार नाही.
- आज सारं जग भारताकडे आदराने पाहतंय
- गरीब मुलांच्या शिक्षणासाठी सगळ्यांनी योगदान द्यावं अशी विनंतीही त्यांनी केली.
- गॅस सबसिडी सोडणाऱ्यांचंही त्यांनी कौतूक केलं. पंतप्रधानाच्या आव्हानानंतर 1 कोटी लोकांनी गॅस सबसिडी सोडली ज्यामुळे गरीबांच्या घरोघरी सिलेंडर पोहोचले.
- मानवतेची भावना असणारा न्यू इंडियाचा डी.एन.ए आमच्यामध्ये रचावा,रूजावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली