नवी दिल्ली, 8 सप्टेंबर : बिहारमध्ये सत्तांतर केल्यानंतर राष्ट्रीय समिकरणं बदलण्यासाठी नितीश कुमार (Nitish Kumar) दिल्लीमध्ये आले आहेत. मागच्या दोन दिवसांमध्ये नितीश कुमार यांनी दिल्लीत भाजप विरोधात असलेल्या नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. दिल्लीत आलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishore) यांच्यावर टीका केली. प्रशांत किशोर यांना बिहारबद्दल एबीसीदेखील माहिती नाही, त्यावर आता प्रशांत किशोर यांनी पलटवार केला. काहीही कॅप्शन न देता प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 4 फोटो शेअर केले. या सगळ्या फोटोंमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हात जोडून मोदींना अभिवादन करत आहेत. काही वेळानंतर प्रशांत किशोर यांनी हे फोटो डिलीटही केले. नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडून महागठबंधन केलं, याचा परिणाम बिहारमध्ये होईल, पण याचा राष्ट्रीय प्रभाव पडणार नाही, असं प्रशांत किशोर म्हणाले होते. प्रशांत किशोर गुप्तपणे भाजपची मदत करत असतील, असा आरोपही नितीश कुमार यांनी केला आहे.
‘राजकीय पक्षांसोबत काम करणं त्यांचा व्यवसाय आहे. त्यांना बिहारमध्ये जे काही करायचं आहे, त्याबद्दल आम्हाला काहीच अडचण नाही. 2005 नंतर जे करण्यात आलं त्याची एबीसी त्यांना माहिती आहे का? ते जे काही बोलत आहेत त्याला काहीही अर्थ नाही. त्यांना भाजपसोबत राहायचं असेल, कदाचित त्यांना भाजपची मदत करायची असेल,’ असं नितीश कुमार म्हणाले. काय म्हणाले होते प्रशांत किशोर? ‘नितीश कुमार यांचं महागठबंधन राज्यापुरतंच मर्यादित आहे, याचा परिणाम राष्ट्रव्यापी होणार नाही. बिहारमध्ये झालेला सत्ताबदल राजकीय अस्थिरतेचं प्रतिक आहे, जे मोदींच्या नेतृत्वात नव्या भाजपच्या उदयानंतर राज्यांना त्रास देत आहे,’ असं प्रशांत किशोर म्हणाले होते. प्रशांत किशोर यांच्या या वक्तव्यावर नितीश कुमार यांनी प्रत्युत्तर दिलं, त्यानंतर प्रशांत किशोर यांनी पुन्हा पलटवार केला, पण त्यांनी हे ट्वीट डिलीट का केलं? हे मात्र स्पष्ट होऊ शकलं नाही.