नवी दिल्ली, 16 एप्रिल: काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी (Congress interim president Sonia Gandhi) यांनी शनिवारी दुपारी त्यांच्या निवासस्थानी 10 जनपथ येथे बैठक बोलावली. ज्यामध्ये निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) देखील उपस्थित होते. न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर व्यतिरिक्त काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge), ए के अँटनी, अंबिका सोनी, जयराम रमेश, मुकुल वासनिक, दिग्विजय सिंह आणि अजय माकन हे देखील या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी 10 जनपथवर पोहोचले. प्रशांत किशोर यांनी नुकतेच एका निवेदनात म्हटलं होतं की, योग्य रणनीतीनं वेळेवर तयारी सुरू केल्यास 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचा पराभव करणं शक्य आहे. पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मजबूत करण्यासाठी प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी बोलणी सुरू केल्याचं बोललं जात आहे. गुजरात निवडणुकीत काँग्रेस पक्ष प्रशांत किशोर यांच्याकडे मोठी भूमिका सोपवू शकतो, अशीही काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. यापूर्वी एका मुलाखतीत स्वतः प्रशांत किशोर यांनी मे महिन्यात त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत मोठी घोषणा करणार असल्याचं सांगितलं होतं.
Congress leaders Ambika Soni, Digvijaya Singh, Mallikarjun Kharge and Ajay Maken arrive at the residence of party chief Sonia Gandhi in Delhi.
— ANI (@ANI) April 16, 2022
Rahul Gandhi and KC Venugopal are also present at her residence. pic.twitter.com/I2CVyBdCly
दरम्यान, प्रशांत किशोर यांच्या जवळच्या सूत्रांचं म्हणणे आहे की, काँग्रेससाठी निवडणूक रणनीतीकाराची भूमिका बजावण्याऐवजी त्यांचा पक्षात प्रवेश होण्याची शक्यता अजूनही दूर आहे. मात्र प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2021 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या विजयानंतर काही आठवड्यांनंतर प्रशांत किशोर यांनी काँग्रेस हायकमांडसोबत बैठक केली होती, जी कोणत्याही निकालाशिवाय संपली. उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसने नंतर प्रशांत किशोर यांच्या माजी सहकाऱ्याशी हातमिळवणी केली. प्रशांत किशोर यांची टीम गुजरातमध्ये काँग्रेससाठी सर्वेक्षणही करत असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. या बैठकीपूर्वी प्रशांत किशोर यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचीही भेट घेतली आहे. पंजाब निवडणुकीपूर्वीही प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या बड्या नेत्यांसोबत अनेक बैठका केल्या होत्या. त्यानंतरही ते काँग्रेसमध्ये सामील होतील अशी चर्चा होती, जी प्रशांत किशोर यांनी फेक न्यूज म्हणून खोडून काढली होती.