नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर (Pragya Singh Thakur)या त्यांच्या वादग्रस्त वक्यव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. बुधवारी लोकसभेमध्ये एसपीजी संशोधन विधेयकावर चर्चा करताना महात्मा गांधी यांचे हत्यारे नथूराम गोडसे याला ‘देशभक्त’ नावाने संबोधलं. याला काँग्रेसने कडाडून विरोध केला आहे. सदनामध्ये जेव्हा डीएमके सदस्य ए राजा यांनी चर्चा करताना गोडसेचं उदाहरण दिलं. तेव्हा प्रज्ञासिंग आपल्या जागेवर उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या की, ‘देशभक्तांची उदाहरणं देऊ नका’. यावर काँग्रेसच्या काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आणि कडाडून विरोध दर्शवला. त्यानंतर या दरम्यान संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रज्ञासिंग यांनी खाली बसण्यासाठी इशारा केला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी कॉंग्रेस सदस्यांना शांत बसण्याचे आवाहन केले. खरंतर प्रज्ञासिंग यांनी याआधीही गोडसेला ‘देशभक्त’ म्हणाल्या आहेत. ज्यावरून मोठा वाद झाला होता. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासगळ्यावर नाराजी व्यक्त करत पुन्हा कोणी अशी चूक केल्यास त्याला माफ केलं जाणार नाही असं म्हटलं होतं. दरम्यान, आपल्या वक्तव्यांनी कायम वाद निर्माण करणाऱ्या खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या नियुक्तीमुळेदेखील वाद निर्माण झाला होता. साध्वी प्रज्ञा यांची रक्षा मंत्रालयाच्या (Defence Ministry) संसदीय समितीच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. संरक्षण मंत्री अध्यक्ष असलेल्या या समितीत 21 जण सदस्य आहेत. काँग्रेसने साध्वीच्या नियुक्तीवर तीव्र आक्षेप घेतला होता तर भाजपने या नियुक्तीचा बचावही केला होता. साध्वी प्रज्ञा या भोपाळच्या खासदार असून त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजयसिंग यांचा पराभव केला होता. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी भाजपवर टीका करताना म्हटलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महात्मा गांधींच्या तत्वज्ञानाचा कायम उल्लेख करतात आणि वादग्रस्त असलेल्या साध्वीची संरक्षण सल्लागार समितीवर नियुक्ती केली जाते हा भाजपचा दुटप्पीपणा आहे. तर काँग्रेसचे दुसरे नेते जयवीर शेरगील यांनीही ट्विटरवरून काँग्रेसवर निशाणा साधला होता. भाजपने राष्ट्रवादीचं नवं मॉडेल तयार केलं. ज्यांच्यावर बॉम्बस्फोटाचा आरोप आहे अशा लोकांना खासदार केलं आणि आता संरक्षण मंत्रालयाच्या समितीवर नियुक्तीही केली. त्यामुळेच गोडसे भक्तांना अच्छे दिन आले असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.