नवी दिल्ली 30 जून: चीन विरुद्धच्या लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी आणखी एक निर्णय घेतला आहे. चीनचं ट्विटर समजल्या जाणाऱ्या Weiboवर पंतप्रधान मोदींचं अकाउंट होतं. आता हे अकाउंट सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून त्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. त्याच बरोबर आत्तापर्यंतचे बहुतांश ट्विट्स डिलिटही (Delete) केले आहेत. Weiboवरही पंतप्रधानांच्या फॉलोअर्सची संख्या मोठी आहे.
चीनमध्ये फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी आहे. काही वर्षांपूर्वी चीन दौऱ्याआधी पंतप्रधानांनी Weiboवर आपलं अकाउंट उघडलं होतं. चिनी भाषेतून त्यांनी ट्विटसही केले होते. त्याची दखलही सर्व माध्यमांनी घेतली होती. चीनमध्येही त्याचं कौतुक झालं होतं.
मात्र सीमावादाच्या पार्श्वभूमीवर महाबलीपूरम इथं झालेली चर्चा आणि त्यातून निर्माण झालेली मैत्री संपल्याचं बोललं जात आहे. Weibo अतिमहत्वपूर्ण व्यक्तिंची अकाउंट्स बंद करायची एक प्रक्रिया असून ती वेळखाऊ आहे. त्यामुळे ती प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे. तोपर्यंत Weiboवर पंतप्रधानांनी केलेले ट्वीट्स डिलीट करण्यात येत आहेत.
यावर पंतप्रधानांनी आत्तापर्यंत 115 पोस्ट केल्या होत्या. त्यातल्या 113 पोस्ट डिलीट केल्या आहेत. अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासोबत मोदींचे फोटो असलेल्या दोन पोस्ट डिलीट झालेल्या नाहीत. ते फोटो जिनपिंग यांच्यांसोबतचे असल्याने चीनमध्ये अध्यक्षांचा फोटो डिलीट करणं हे अशक्यप्राय गोष्ट आहे.
शांत होण्याची शक्यता दिसत नाही. दोन्ही देशांची सीमा वादावर बोलणी सुरू असतानाच चीनने सीमेवर तब्बल 20 हजार सैनिक (China Army) तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे सैनिक सीमेजवळच्या तळांवर असून कमीत कमी वेळात प्रत्यक्ष LAC जवळ जाता येईल अशा परिस्थितीत ते आहेत अशी माहितीही सूत्रांनी दिलीय. भारताचीही चीनच्या प्रत्येक हालचालींवर करडी नजर असून लष्करानेही सगळी तयारी केली आहे.हे वाचा - दोन्ही देशांमध्ये तिसरी मोठी बैठक, गलवान खोऱ्यातून मागे हटण्यास चीन तयार पण...
लडाख जवळच्या जिनजियांग प्रांतातही चीनने 10 हजार सैनिक आणून ठेवले आहेत. 48 तासांमध्ये प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचता येईल अशी चीनची तयारी आहे. दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या तीन फेऱ्या झाल्या आहेत. सीमेवर शांतता राहावी असं दोन्ही बाजूंकडून ठरलेलं आहे. मात्र ठरलेलं असतानाही चीनचा मुजोरपणा सुरूच असून सीमेवर सैन्याची जमवाजमव करून चीन दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जातं आहे.
संपादन - अजय कौटिकवार