नवी दिल्ली 20 जून: देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे राजकारणी म्हणून प्रसिद्ध असले तरी ते उत्तम अभ्यासक, लेखक आणि विचारवंतही होते. जगाच्या इतिहासाचा त्यांचा सखोल अभ्यास होता. संस्कृती, विज्ञान आणि अर्वाचिन साहित्याचेही ते उत्तम जाणकार होते. आपली लाडकी लेक इंदू म्हणजेच प्रियदर्शनी इंदिरा हिला लिहिलेल्या पत्रांमधून त्यांचा व्यासंग तर दिसतो. त्याचबरोबर त्यांच्यातल्या हळव्या पित्याचंही दर्शन घडतं. राष्ट्रीय आंदोलनात असताना पंडित नेहरू हे कायम प्रवासात, आंदोलनात किंवा जेलमध्येच असायचे. त्यामुळे आपल्या लेकीसाठी वेळ द्यायला जमत नाही याची त्यांना कायम खंत होती. मात्र जमेल त्या माध्यमातून ते इंदूच्या संपर्कात राहत असतं. यातूनच त्यांना तिला पत्र लिहून जगाचा इतिहास आणि संस्कृती समजून सांगण्याची इच्छा झाली. 1928मध्ये उन्हाळ्यात त्यांनी इंदिरेला 30 पत्र लिहिली. त्यावेळी त्या 10 वर्षांच्या होत्या. ती खासगी वाटणारी पत्र एवढी प्रसिद्ध झाली की 1929मध्ये त्याचं पुस्तकच निघालं. नंतर ती पत्र जगभर गेली. अनेक भाषांमध्ये त्याची भाषांतरं झाली. आपल्या मुलीला जगाचा इतिहास आणि संस्कृती कळावी, राजकारणाचं भान यावं, तिच्या विचारांना चालना मिळावी, दृष्टीकोन विशाल व्हावा यासाठी त्यांनी ही पत्र लिहिली होती. मानवी संस्कृतीचा उदय, जगाचा इतिहस, सृष्टीची रचना, वेगवेगळ्या संस्कृतीचा उदयास्त, भाषा, साहित्य, रामायण, महाभारत अशा सगळ्या गोष्टींचा वेध घेत त्यांनी आपल्या 10 वर्षांच्या मुलीला समजेल अशा भाषेत ती पत्र लिहिली आहेत. Letters from a Father to His Daughter या नावाने ती प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर नेहरू तुरुंगात असताना त्यांनी इंदिरेला 190 च्या वर पत्रे लिहिली. पण ही पत्रे इंदिराजींच्या हाती पडत नसत. त्यांनी जगाचा इतिहास छोटय़ा इंदूला या पत्रातून सांगायला सुरुवात केली. ‘ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री’ या नावाने पुढे तीही पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली आहेत. संकलन - अजय कौटिकवार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.