नवी दिल्ली 26 फेब्रुवारी : पुलवामाच्या भीषण आत्मघातकी हल्ला झाल्यानंतर भारताने दुसऱ्याच दिवशी हवाई हल्ल्याचा निर्णय घेतला होता अशी माहिती सूत्रांनी दिली. सर्जिकल स्ट्राईक एकदा झाल्यानंतर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करणं फायद्याचं नव्हतं. त्यामुळे हवाई हल्ल्याचा निर्णय घेण्यात आला.
14 फेब्रुवारीला पुलवामाचा हल्ला झाला. त्यानंतर दिल्लीत परतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री महत्त्वाची बैठक घेतली होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तीनही सेना दलांचे प्रमुख, RAW आणि IB या गुप्तचर संस्थांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेऊन काय प्रत्युत्तर देता येईल असा प्रश्न पंतप्रधानांनी तीनही सेना प्रमुखांना विचारला.
तीनही दलांच्या प्रमुखांनी पंतप्रधानांना त्यांचं मत सांगितलं आणि नंतर दुसऱ्याच दिवशी हवाई हल्ल्याचा निर्णय घेण्यात आला. अतिशय गुप्तपणे हे ऑपरेशन आखण्यात आलं. नंतर पंतप्रधानांनी घेतलेल्या जाहीर सभेत त्यांनी दहशतवाद्यांना मोठं मोल चुकवावं लागेल असा इशारा दिला होता.
ऑपरेशन Air Strike
NSA अजित डोवाल यांनी या कारवाईचं समन्वयन केलं. हवाई दलाचे प्रमुख बिरेंद्र सिंग धनोआ यांनी हल्ल्याची संपूर्ण योजना तयार केली. कारवाईची प्रत्येक गोष्ट डोवाल पंतप्रधानांना देत होते. रात्रंदिवस संरक्षण मंत्रालयात बैठका सुरू होत्या. अज्ञात ठिकाणी सर्व योजना तयार करण्यात येत होती. पंतप्रधानांसह फक्त मोजक्या तीन मंत्र्यांना या कारवाईची माहिती होती.
भारत काही करावाई करणार आहे अशी माहिती NSA अजित डोवाल यांनी अमेरिका, फ्रान्स, रशीया, ब्रिटन यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना दिली आणि विश्वासात घेतलं. भारताने कारवाई केली तर त्या देशांनी समर्थन द्यावं अशी पूर्ण व्यवस्था भारताने केली होती.
दहशतवाद्यांचे तळ निश्चित करणं हे भारतापुढे सर्वात मोठं आव्हान होतं. कारण सीमेजवळच्या सर्व तळ पाकिस्तानने रिकामे केले होते. त्यामुळे गुप्तचर संस्था आणि उपग्रहांच्या मदतीने पाकव्याप्त काश्मीरमधलं बालाकोट हे ठिकाण निश्चित करण्यात आलं.
पाकिस्तान काय प्रत्युत्तर देऊ शकते याचा अंदाज लक्षात घेऊन पूर्ण खबरदारी घेण्यात आली होती. पाकिस्तान थोडा गाफिल राहावा यासाठी पंतप्रधान देशभर विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत होते. राजकीय सभा आणि कार्यक्रम सुरू असल्याने भारत पूर्वपदावर येत आहे असा समज पाकिस्तानचा होत होता.
IndiaStrikeBack : परराष्ट्र सचिवांची UNCUT पत्रकार परीषद