लखनऊ, 5 डिसेंबर : कोरोनामुळे लोकांचं एकमेकांना भेटणं काहीसं कमी झालं आहे. अनेक जणांच प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा डिजिटलीच भेटण्याचं प्रमाणही सध्या वाढलं आहे. कोरोनामुळे एका जोडप्याने चक्क डिजिटल पद्धतीने लग्न केल्याचं समोर आलं आहे. या अनोख्या लग्नात नवरी होती, बाराती होते पण नवरामुलगा नव्हता. नवरामुलगा प्रत्यक्ष नसूनही त्याने सर्व विधी करत आपला निकाह कबूल केला.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
जौनपूर जिल्ह्यातील एका गावात हा अनोखा लग्न समारंभ पाहण्यात आला. कोरोना काळातील अनेक निर्बंधांमुळे सौदी अरब येथे राहणारा मुलगा आपल्या घरी येऊ शकला नाही. अशात त्याच्या कुटुंबियांनी ऑनलाईन लग्नाचा प्लॅन केला. नवऱ्या मुलाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या निकाहच्या सर्व विधी पार पाडल्या. लग्नात एक मोठी स्क्रिन लावण्यात आली होती, ज्यावर मुलगा, त्याच्या मित्रांसह, सर्वांना दिसत होता.
कोरोनाच्या निर्बंधांमुळे गुरुवारी संध्याकाळी काही जवळच्या नातेवाईकांसह 30 ते 40 लोक लग्नात सामिल झाले होते. लग्नात सोशल डिस्टन्सिंगचंही पालन करण्यात आलं होतं. नवरा मुलगा प्रत्यक्ष नसतानाही, लग्न पार पडलं आणि नवरी आपल्या सासरीही गेली.
काजी हयात यांची मुलगी तहरीन जैदी हिचा गेल्या कित्येक दिवसांपूर्वी अकील अब्बास रिजवीशी निकाह ठरला होता. परंतु लॉकडाउनमुळे ही तारीख सतत पुढे ढकलली जात होती. परंतु लॉकडाउन संपल्यानंतरही अकील अब्बास रिजवी आपल्या लग्नासाठी पोहचू शकला नाही आणि त्यांनी ऑनलाईनच, निकाह पार पाडला.