गुलशन कश्यप, प्रतिनिधी जमुई, 27 जुलै : देशात सातत्याने विविध अपघाताच्या घटना समोर येत असतात. त्यामध्ये काही अपघात हे फारच भीषण असतात. अशातच आता बिहारच्या जमुई येथून भीषण अपघाताची एक घटना समोर आली आहे. भीषण अपघाताच्या या घटनेने सर्वच जण हादरले आहेत. एका दुचाकीस्वाराने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, तो व्यक्ती अगदी एखाद्या चेंडूप्रमाणे वर उडाला आणि जवळपास 10 फूट जाऊन दूर खाली पडला. या भीषण अपघातात दुचाकी स्वाराने दिलेल्या जोरदार धडकेत या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना लक्ष्मीपूर ठाणे परिसरातील जिन्हरा येथे घडली. पेंचू मंडल असे 45 वर्षीय मृताचे नाव आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी उशिरा पेंचू मंडल जिन्हरा गावातील काली मंदिराजवळ उभे होते. त्यांना रस्त्याच्या पलीकडे जायचे होते. त्यामुळे ते वाहने जाण्याची वाट पाहत होते. मात्र, इतक्यात लक्ष्मीपूरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, पेंचू मंडल चेंडूसारखे हवेत उडाले आणि 10 फूट अंतरावर पडले. यानंतर त्यांना उपचारासाठी लक्ष्मीपूर रेफरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर दुचाकीस्वार फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेहाला ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे. या भीषण अपघातानंतर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.