मोहाली, 20 एप्रिल: जगातील सर्वात जास्त काळ जगलेल्या महिलेचा अखेर 16 एप्रिल 2021 ला मृत्यू झाला. वयाच्या 119 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाच पिढ्यांना या महिलेनं आपल्या अंगाखांद्यावर खेळवलं होतं. या महिलेचे नाव बच्चन कौर (Bachchan Kaur) असे असून ती पंजाबच्या मोहाली जिल्ह्यातील कसबा बनुडमधील मोटे माजरा या खेड्यातील रहिवासी होती. बच्चन कौरची अंत्ययात्रा बँड-बाजा वाजवत काढण्यात आली. संपूर्ण कुटुंबासह गावातील नागरिक बच्चन कौर यांना मानाने निरोप देण्यासाठी आले होते.
सैनिकी नोंदीनुसार, बच्चन कौर (Bachchan Kaur oldest Women) यांचा जन्म 1901 मध्ये झाला होता. त्यांचे पती स्वर्गीय जीवनसिंग दोन्ही महायुद्धांमध्ये लढले होते. बच्चन कौर यांनी एकूण 9 मुलांना जन्म दिला, त्यापैकी 3 मुली आणि 2 मुले सध्या जिवंत आहेत. मोठी मुलगी प्रीतम कौर 87 वर्षांची आहे, तर मोठा मुलगा प्रीतम सिंग 79 वर्षांचा आहे. प्रीतम सिंग यांनी सैन्यात सुभेदार म्हणून कर्तव्य बजावले आहे. विशेष म्हणजे बच्चन कौर यांचे नातू बाबसिंग हे दोन वर्षांपूर्वीच भारतीय सैन्यातून निवृत्त झाले होते.
बच्चन कौर यांचा जन्म 1899 मध्ये झाला होता मात्र..
आईचा जन्म खरंतर 1899 मध्ये झाला होता. आमचे वडील जीवनसिंग हे ब्रिटीश भारतीय सैन्य दलात सैनिक होते, त्यामुळे सैन्याच्या नोंदीत तिचे जन्म वर्ष 1901 नोंदविले गेले. सध्या जपानच्या 118 वर्षांच्या केन तानाका यांचे नाव 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' (Ginij Book of World Record) मधील सर्वात वयोवृद्ध जीवित महिला म्हणून नोंद आहे. परंतु, आमची आई बच्चन कौर त्यांच्यापेक्षा वयाने मोठी होती, कारण सरकारी नोंदीनुसार ती 119.6 महिने जगली आहे, असे बच्चन कौर यांचा सेवानिवृत्त मुलगा सुभेदार प्रीतम सिंग यांनी सांगितले.
(हे वाचा-माणुसकीचं दर्शन!हिंदू व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून सलमानने सोडला रोजा)
बच्चन कौर यांनी निरोगी आयुष्य जगले
कोणतेही विशेष आजार आणि औषधांशिवाय त्यांनी निरोगी आयुष्य जगले. त्यांना दूध आणि तुपाची विशेष आवड होती. पंजाबी अन्न हे शेवटच्या काळापर्यंत त्याच्या आरोग्याचे रहस्य राहिले. रक्तदाब, मधुमेह यासारख्या आरोग्याच्या समस्या त्यांना कधीच आल्या नव्हत्या. कधीकधी ताप किंवा खोकल्यासारख्या समस्या उद्भवत होत्या, मात्र औषधाने ते बरे व्हायचे. मात्र, अलीकडे वाढत्या वयामुळे त्या थकल्या होत्या. त्या अगोदर शेतात जायच्या, चारा आणायच्या, दुभत्या जनावरांची काळजी घेणे, अशी कामे करत होत्या, असे कुटुंबीयांनी सांगितले. त्यांचा छोटा मुलगा अजयबसिंग हा चंदीगडच्या आरोग्य विभागात काम करत होता. सुमारे वर्षापूर्वी त्यांनी आईच्या सेवेसाठी निवृत्ती घेतली होती. आईच्या इच्छेनुसारच तिने त्यांच्या गावातच अखेरचा श्वास घेतला, याचे सर्वांना समाधान आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India, Old woman, Old woman survived, Punjab, Record, World record