बालासोर, 13 जून : ओडिशातील बालासोरमध्ये तीन ट्रेन एकमेकांवर आदळल्यानं मोठा अपघात झाला होता. 2 जून 2023 रोजी झालेल्या या अपघातामध्ये 288 प्रवाश्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक हजाराहून अधिकजण जखमी झाले होते. सध्या या अपघाताचा सीबीआयकडून तपास केला जात असून, या तपासात मोठी माहिती समोर येतेय. सीबीआयकडून या प्रकरणी लवकरच रेल्वेच्या पाच कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. बालासोर येथील रेल्वे अपघाताची सीबीआय चौकशी करत असून, त्यांच्या तपासाची सुई 5 रेल्वे अधिकाऱ्यांकडे वळलीय. या 5 अधिकाऱ्यांपैकी 4 रेल्वेच्या सिग्नलिंग विभागाचे कर्मचारी आहेत, तर 1 जण बहनगा बाजार रेल्वे स्टेशनचा सहाय्यक स्टेशन मास्तर आहे. रेल्वे अपघाताच्या तपासात सीबीआय लवकरच या पाच कर्मचाऱ्यांची चौकशी करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, ‘या संपूर्ण प्रकरणात सहाय्यक स्टेशन मास्टर एस.बी. मोहंती आणि चार रेल्वे कर्मचार्यांची चौकशी सुरू आहे. मात्र जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत ते पूर्वीप्रमाणेच त्यांचे काम करीत राहतील.’ म्हणून झाला अपघात? रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ‘ज्या दिवशी रेल्वे अपघात झाला, त्याच दिवशी सिग्नलिंग विभागाच्या या कर्मचाऱ्यांनी तेथे दुरुस्तीचं काम केलं होतं. दुरुस्तीच्या कामामुळे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये काही छेडछाड झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे, व त्यामुळेच ही दुर्घटना घडली आहे. यामुळेच सीबीआयनं या पाच कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केलीय.’ इंटरलॉकिंग सिस्टमशी छेडछाड करणं धोकादायक रेल्वेची इंटरलॉकिंग सिस्टीम ही रेल्वेची मज्जासंस्था आहे, म्हणजेच ही सिग्नल, क्रॉसिंग आणि पॉइंट्स या सर्वांना परस्पर जोडलेली प्रणाली आहे, जी रेल्वे सेवा सुरळीत चालण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. देशातील एवढ्या मोठ्या रेल्वेच्या जाळ्यात रेल्वेसेवा कशी सुरळीत चालू आहे, हे रेल्वेच्या इंटरलॉकिंग सिस्टीमद्वारे समजत असते. एका टेस्टकडे दुर्लक्ष करणं पडलं महागात? रेल्वे आणि सीबीआयच्या तपासात सहकार्य करणार्या तांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, सिग्नलिंग प्रक्रियेत काही दुरुस्तीचे काम केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी फिजिकल प्रोटोकॉल टेस्ट केली नसल्याची शक्यता आहे. ज्यामुळे मशिनमध्ये ग्लिच राहिले असावे, आणि ही चूक या अपघाताचे कारण बनली असावी.’ दरम्यान, सीबीआयनं आतापर्यंत कधी रेल्वे अपघाताची चौकशी केली नव्हती. एखाद्या रेल्वे अपघाताची सीबीआय चौकशी होण्याची ही पहिलीच घटना आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.