भोपाळ, 28 जून : कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यादरम्यान आर्थिक व मानसिक अडचणीमुळे अनेक आत्महत्याच्या घटना समोर आल्या आहेत.
भोपाळ येथे एका तरुणाने वैयक्तिक कर्ज घेतले होते, मात्र लॉकडाऊनमध्ये काम बंद झाल्याने या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लॉकडाऊन दरम्यान हप्ता जमा न केल्याने व्याज वाढू लागले आणि तरूण नैराश्यात आला होता. कुटुंबीयांनीही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्या तरूणाने धक्कादायक पाऊल उचलले आणि मोठ्या तलावात उडी मारून आत्महत्या केली.
या युवकाचा मृतदेह व्हिआयपी रोडवरील मोठ्या तलावातून येथून काढण्यात आला आहे. गोताखोरांनी एका तरूणाने तलावात उडी मारल्याचे सांगितले. गोताखोरांच्या पथकाने तलावामध्ये अनेक तास शोध घेतल्यानंतर त्या तरूणाचा मृतदेह बाहेर काढला. तलैया पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामाच्या कारवाईनंतर शव पोस्टमॉर्टमसाठी हमीदिया रुग्णालयात नेण्यात आला.
या युवकाने वैयक्तिक कर्ज घेतले होते
गौतम नगर भागात राहणारा विवेक राठोड असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिसांना विवेकच्या घरातून कोणतीही सुसाइड नोट मिळाली नाही. विवेकच्या भावाने तलाई पोलीस स्टेशनला सांगितले की, विवेक नवीन शहरात खासगी नोकरी करायचा. त्याने वैयक्तिक कर्ज घेतले होते. या कर्जामुळे तो बरेच दिवस त्रस्त होता.
कुटुंबातील सदस्यांनीही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता. हळू हळू त्याचे कर्ज फेडू असेही सांगितले. मात्र असे असूनही विवेकचा तणाव कमी झाला नाही.
वास्तविक लॉकडाऊन दरम्यान विवेक वैयक्तिक कर्जाचा हप्ता जमा करू शकला नाही. हप्ता जमा न केल्याने त्याच्यावरील व्याज वाढतच गेले. त्याची खासगी नोकरीही नव्हती. तलैया पोलीस स्टेशनचे प्रभारी डीपी सिंह म्हणाले की, वैयक्तिक कर्ज जमा न केल्यामुळे तो तणावात होता आणि यातूनच तो नैराश्यात गेला होता. ते कर्ज कधीच फेडता येणार नाही, या भीतीने त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.
बहिणीच्या लग्नाची होती जबाबदार
पोलिसांनी विवेकच्या कुटुंबाशी संवाद साधला असता, आपल्या बहिणीच्या लग्नासाठी जबाबदारीही विवेकवर होती ही बाब समोर आली आहे. त्याचे वडील भाजीचा व्यवसाय करतात. त्या दिवशी विवेक बाहेर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्याने कुटुंबीय घाबरले. त्यानंतर त्यांनी गौतम नगर पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली.