नवी दिल्ली, 03 जुलै: दिल्लीत बुराडी भागात राहणाऱ्या भाटिया कुटुंबातल्या 11 जणांच्या मृत्यूचं गूढ उलगडण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. पण पोलिसांच्या या शोध मोहिमेत दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. पूर्ण कुटुंब मोक्ष प्राप्तीसाठी आणि आपल्या दिवंगत वडिलांना भेटण्यासाठी तंत्र- मंत्र करायचे. मोक्ष प्राप्तीची एक प्रक्रिया म्हणून संपूर्ण कुटुंबाने सामुहिक आत्महत्या केली. सुरूवातीला ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय कुटुंबातील इतर व्यक्तींनी व्यक्त केला होता. पण आता या ११ जणांच्या मृत्यूमध्ये कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीचा सहभाग नसून त्यांनीच आपल्या आत्महत्येची तयारी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट होत आहे. आत्महत्या करण्याआधीचे या कुटुंबाचे शेवटच्या क्षणाचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले आहे. पोलिसांनी फर्नीचरच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले. या फुटेजमध्ये कोणालाही घरात जाताना पाहण्यात आले नाही पण भाटिया कुटुंबाची मोठी सून सविता प्लॅस्टिकचे 6 स्टुल घेऊन जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली. आत्महत्येच्यावेळी याच स्टुल आणि वायरचा उपयोग करण्यात आला होता. रात्री 10 वाजता सविता तिच्या मुलीसोबत स्टुल आणताना दिसत आहे तर कुटुंबातील सर्वात लहान सदस्य ध्रुव (12) आणि शिवम (15) यांना त्याच दुकानातून तारा आणताना पाहण्यात आले. याआधी पोलिसांच्या हाती भाटिया कुटुंबियांच्या डायरीही लागल्या. डायरीमध्ये जो मजकूर लिहिलेला आहे, त्यावरुन अंधश्रद्धेतून या आत्महत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ललित भाटिया हा आपल्या वडिलांच्या फार जवळ होता. वडिलांच्या मूत्युमुळे त्यांना एवढा मानसिक धक्का बसला की त्यांचा आवाजच गेला. अनेक उपाय करुनही त्यांचा आवाज काही परत आला नाही. त्यामुळे ते आपली प्रत्येक गोष्ट लिहून सांगायचे. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार ललित अनेकदा त्यांचे बाबा त्यांना दिसतात आणि त्यांच्याशी गप्पा मारतात असे वारंवार सांगायचा. डायरीतील जास्तीत जास्त लिखाण ललितचे आहे. पोलिसांना प्रियांका भाटियाने लिहिलेल्या काही नोट्स मिळाल्या. प्रियांकाचा 17 जूनला साखरपुडा झाला होता. मिळालेल्या काही नोट्सनुसार, संपूर्ण परिवाराला ते मरतील याची अजिबात अपेक्षा नव्हती. त्यांना खात्री होती की, त्यांचे दिवंगत बाबा येऊन संपूर्ण कुटुंबाला वाचवतील. डायरीच्या एका पानावर ललितने लिहिले होते की, ‘शेवटच्या क्षणी जमीन कापेल, आकाश फाटेल. पण तुम्ही घाबरू नका. मी येईन… तुला वाचवेन… इतरांनाही वाचवेन. या प्रक्रियेनंतर आपण सर्व एकत्र येऊ.’ शेवटच्या डायरीतील शेवटचे वाक्य असे होते कि, एका कपमध्ये पाणी भरुन ठेवा. जेव्हा त्या पाण्याचा रंग बदलेल ते मी प्रगट होऊन तुम्हाला सर्वांना वाचवीन. आत्महत्येच्या दिवशी हे वाक्य त्या डायरीमध्ये लिहिले होते. रात्री एकच्या सुमारास सर्वांनी मिळून सामूहिक आत्महत्या केली. हे कुटुंब २००७ पासून अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याचं समोर येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.