Home /News /national /

महाराष्ट्राच्या चित्ररथाला दिल्लीच्या परेडमध्ये केंद्राने परवानगी नाकारली

महाराष्ट्राच्या चित्ररथाला दिल्लीच्या परेडमध्ये केंद्राने परवानगी नाकारली

'या मागे राजकिय षडयंत्र आहे काय आम्ही प्रखर राष्ट्रभक्त आहोत हा आमचा गुन्हा आहे का? महाराष्ट्राला डावलून केंद्र सरकारला कोणता घोडा पुढे सरकवायचा आहे. हे काँग्रेस राजवटीत घडले असते तर महाराष्ट्र भाजपाने बोंबाबोंब केली असती. आज गप्प का?'

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली 02 जानेवारी : राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीला होणारी परेड ही आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. लष्कराच्या पथसंचलनानंतर सर्व राज्यांचे चित्ररथ हे राजपथावर दिमाखात येत असतात. त्यातून सर्व देशाच्या संस्कृतीचं महत्त्व दाखवलं जातं. या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ हा कायम लक्षवेधी ठरतो. अनेकदा या चित्ररथाला पुरस्कारही मिळालाय. मात्र यावर्षीच्या परेडमध्ये राज्याचा चित्ररथ दिसणार नाही. केंद्र सरकारने सूडबुद्धीने परवानगी दिली नसल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. हा देशाचा उत्सव असून विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांना ही सापत्न वागणूक असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. सुप्रिया सुळे म्हणाल्या, प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या संचलनात महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या चित्ररथास केंद्र सरकारने परवानगी नाकारली. हा देशाचा उत्सव असून केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिनिधित्व देणे अपेक्षित आहे. परंतु सरकार आकसाने वागत असून विरोधकांची सत्ता असणाऱ्या राज्यांना सापत्नभावाची वागणूक देतेय. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावली आहे. या राज्यांना परवानगी नाकारण्याची कृती हा येथील जनतेचा अपमान आहे. केंद्र सरकारच्या या कृतीचा जाहिर निषेध अशी टीकाही त्यांनी केलीय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलंय. ते म्हणाले, महाराष्ट्र आणि प.बंगालचे चित्ररथ यावेळी प्रजासत्ताक दिनी दिसू नयेत या मागे राजकिय षडयंत्र आहे काय आम्ही प्रखर राष्ट्रभक्त आहोत हा आमचा गुन्हा आहे का? महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावरील संचलनात नेहमीच देशाचे आकर्षण ठरत आला. अनेकदा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्राला डावलून केंद्र सरकारला कोणता घोडा पुढे सरकवायचा आहे. हे काँग्रेस राजवटीत घडले असते तर महाराष्ट्र भाजपाने बोंबाबोंब केली असती. आज गप्प का? तर केंद्र सरकारने हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. राजपथावर ज्या चित्ररथांना परवानगी देण्यासाठी केंद्राची एक तज्ज्ञ समिती असते. ही समिती विविध राज्य आणि केंद्राच्या मंत्रालयाकडून आलेल्या प्रस्तावांची छाननी करून त्यांना परवानगी देत असते.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Republic Day parade

    पुढील बातम्या