मुंबई : दाऊद इब्राहिमसंदर्बात आता NIA कडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. जो कोणी दाऊदची माहिती देईल त्याला 25 लाख रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. दाऊदच नाही तर त्याच्या साथीदारांचीही माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळणार असल्याचं सांगितलं आहे. प्रत्येक साथीदारावर वेगवेगळी रक्कम जाहीर करण्यात आली आहे. भारतात सगळ्या काळ्या धंद्यांमध्ये दाऊद इब्राहिमचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. ड्रग्स, हत्यारं, स्फोटकं अशा अनेक धंद्यामागे त्याचे हात असल्याने फुस मिळते आहे. ज्यातून देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचत आहे. त्यामुळे दाऊदची माहिती देणाऱ्याला 25 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येणार असल्याचं NIA कडून सांगण्यात आलं आहे. इब्राहिमचा भाऊ हाजी अनीस, त्याचा खास जावेद पटेल ऊर्फ जावेद चिकना, छोटा शकील आणि इब्राहिम मुस्ताक अब्दुल रज्जाक मेनन ऊर्फ टायगर मेनन यांची माहिती देणाऱ्यांनाही बक्षीस देण्यात येणार आहे. छोटा शकीलवर 20 लाख आणि उर्वरित अनीस, चिकना, मेननवर 15 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. दाऊदच्या नावे पहिल्यांदाच असं बक्षीस जाहीर केलं नाही तर याआधी देखील अशा प्रकारे बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. दाऊद मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन आहे. 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटासह अनेक प्रकरणांमध्ये त्याचा हात आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने यापूर्वीच दाऊदवर 2003 मध्ये 25 लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर केलं होतं. दाऊदशिवाय भारताच्या मोस्ट वॉन्टेड यादीत लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुखही असल्याची माहिती मिळाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.