नवी दिल्ली, 25 मे : भारताच्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन 28 मे रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसद भवनाचं उद्घाटन करणार आहेत, पण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते उद्घाटन होणार नसल्यामुळे 19 विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे सत्ताधारी एनडीए आघाडीसह 25 राजकीय पक्ष उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निमंत्रणानंतर पंतप्रधान नव्या संसद भवनाचं उद्घाटन करतील.
नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे), नॅशनल पिपल्स पार्टी, नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव पार्टी, सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा, जन नायक पार्टी, एआयएडीएमके, आयएमकेएमके यांच्यासह एनडीएचे पक्ष सहभागी होणार आहेत. याशिवाय वायएसआरसीपी, बीजू जनता दल, तेलगू देसम पार्टी, बीएसपी, लोक जनशक्ती पार्टी (पासवान), अपना दल (सोनेलाल), तामिळ मनिला काँग्रेस, शिरोमणी अकाली दल, मिजो नॅशनल फ्रंट, एजेएसयू (झारखंड), जनता दल (एस) सह गैर-एनडीए पक्षांनीही आपण सहभागी होणार असल्याचं सांगितलं आहे.
19 पक्षांचा बहिष्कार
उद्घाटनावर बहिष्कार टाकणाऱ्या 19 पक्षांमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डीएमके, जनता दल (युनायटेड), आम आदमी पार्टी, सीपीआय-एम, सीपीआय, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), राष्ट्रीय जनता दल, आययूएमएल, झारखंड मुक्ती मोर्चा, नॅशनल कॉनफरन्स, केसी (एम), आरएसपी, वीसीके, एमडीएमके आणि आरएलडी या पक्षांनी संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे.
त्रिकोणी आकारामध्ये बांधण्यात आलेल्या या संदस भवनाला उभारण्यासाठी 971 कोटी रुपये खर्च आला. ही इमारत 4 मजल्यांची आहे, तर संपूर्ण कॅम्पस 64,500 वर्ग मीटर परिसरात पसरला आहे. संसद भवनाचे तीन द्वार आहेत ज्याची नावं ज्ञान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वार असतील. व्हीआयपी, खासदार आणि व्हिजिटर्स एण्ट्री वेगवेगळ्या गेटने होईल.
नव्या संसद भवनामध्ये लोकसभेसाठी 888 जागांची क्षमता आहे, ज्याला भारताचा राष्ट्रीय पक्षी मोरा प्रमाणे डिझाईन करण्यात आलं आहे. राज्यसभेचा आकार राष्ट्रीय फूल कमळाच्या आकारावर ठेवण्यात आला आहे. राज्यसभेमध्ये आता 384 जागांची क्षमता असणार आहे. लोकसभा हॉलच्या संयुक्त सत्रामध्ये 1,272 सदस्य सहभागी होऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.