Home /News /national /

नागालँडमध्ये गोळीबार, 13 जणांचा मृत्यू; संतप्त गावकऱ्यांनी जाळल्या सुरक्षा दलाच्या गाड्या

नागालँडमध्ये गोळीबार, 13 जणांचा मृत्यू; संतप्त गावकऱ्यांनी जाळल्या सुरक्षा दलाच्या गाड्या

घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या पेटवून दिल्या. या गोळीबारात आतापर्यंत 13 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

    गुवाहाटी, 05 डिसेंबर: भारतातील ईशान्येकडील नागालँड (Nagaland)राज्यात शनिवारी संध्याकाळी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना (Shocking Incident) घडली आहे. या गोळीबारात आतापर्यंत 13 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर समोर आलेल्या फोटोंमध्ये वाहने जळताना दिसत आहेत. ही घटना नागालँडमधील मोन जिल्ह्यातील ओटिंग (Oting) गावातली आहे. वृत्तानुसार, घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी सुरक्षा दलाच्या गाड्या पेटवून दिल्या. नागालँडचे मुख्यमंत्री नेफियो रिओ यांनी लोकांना शांततेचे आवाहन केलं आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी त्यांनी एसआयटी स्थापन केली आहे. मोन जिल्ह्यातील ओटिंग गावात नागरिकांच्या हत्येची दुर्दैवी घटना अत्यंत निषेधार्ह असल्याचं मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलं आहे. मी शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो आणि जखमी लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करतो. या घटनेची उच्चस्तरीय SIT मार्फत चौकशी करून देशाच्या कायद्यानुसार न्याय मिळेल, मी समाजातील सर्व घटकांना शांततेचं आवाहन करतो, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. गृहमंत्री अमित शहा यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. अमित शहा यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, नागालँडमधील ओटिंगच्या दुर्दैवी घटनेनं मला खूप दुःख झालं आहे. ज्यांनी आपले प्राण गमावले आहेत त्यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. शोकग्रस्त कुटुंबांना न्याय मिळावा यासाठी राज्य सरकारनं स्थापन केलेली उच्चस्तरीय SIT या घटनेची सखोल चौकशी करेल. रिपोर्टनुसार, ही घटना मोन जिल्ह्यातील ओटिंगच्या तिरू गावात घडली. या हल्ल्यात ठार झालेले लोक पिकअप मिनी ट्रकमधून परतत होते. काल दुपारी 4 वाजता ही घटना घडल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. बराच वेळ होऊनही हे लोक घरी न परतल्याने गावातील स्थानिक नागरिक त्यांना शोधण्यासाठी बाहेर पडले. त्यानंतर त्यांचे मृतदेह सापडले. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. संतप्त ग्रामस्थांनी सुरक्षा दलाच्या गाड्या पेटवून दिल्या.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Gun firing

    पुढील बातम्या