नवी दिल्ली 02 मे : मेट्रो सिटीजमध्ये म्हणजेच महानगरांमध्ये (Metro Cities) आयटी कंपन्यांची संख्या वाढत आहे. अर्थातच त्यामुळे या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही वाढत आहे; पण अनेक आयटी कंपन्यांचे (IT Companies) पर्याय असल्याने कर्मचारी एकाच कंपनीत खूप काळ राहणं तसं अवघडच असल्याचं चित्र आहे. त्यातही चांगलं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये चढाओढ लागलेली दिसते. अशा परिस्थितीत आपल्या कंपनीत चांगलं काम करणारे कर्मचारी मिळवणं आणि ते टिकवून ठेवणं हे कंपन्यांपुढचं मोठं आव्हान आहे. त्यातही थोडी छोटी शहरं (Small Towns) असतील तर तिथल्या कंपन्यांपुढचा हा प्रश्न सध्या अगदी महत्त्वाचा बनला आहे. काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी विविध योजना किंवा सवलती जाहीर करत आहेत. पण मदुराईतील एका आयटी कंपनीनं यात बाजी मारली आहे. याबद्दलचंच वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. मदुराईमधील SMI (श्री मूकांबिका इन्फोसोल्युशन्स) या कंपनीनं कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी अगदीच आगळीवेगळ्या ऑफर देऊ केल्या आहेत. SMI ही एक खासगी जागतिक टेक्नॉलॉजी सोल्युशन्स (Private Global Technology Solutions) कंपनी आहे. या कंपनीचे क्लाएंट्स मुख्यत: अमेरिकेतील आहेत. या कंपनीनं कर्मचाऱ्यांसाठी मोफत विवाह जमविण्याची ऑफर (Offers Free Matchmaking) देऊ केली आहे. तसंच लग्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्पेशल इन्क्रिमेंटही (Special Marriage Increment) दिलं जाणार आहे. साहजिकच सध्या या ऑफर्सची जोरदार चर्चा सुरु आहे. त्याशिवाय कंपनीत दर सहा महिन्यांनी इन्क्रिमेंट म्हणजेच पगारवाढ ( Half yearly Increment ) दिली जाते. याचा साहजिकच सकारात्मक परिणाम झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून ही कंपनी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचं प्रमाण 10% पेक्षाही कमी आहे. SMI कंपनीत सध्या 750 कर्मचारी काम काम करतात. यातील जवळपास 40 % कर्मचारी इथं पाच वर्षांहूनही अधिक काळ आहेत. फ्रेशर्स उमेदवारांनो, Job Interview दरम्यान तुम्हाला विचारतील ‘हे’ प्रश्न; अशी द्या स्मार्ट उत्तरं 2006 मध्ये SMI कंपनीची शिवकाशीमध्ये (Shivkashi) सुरुवात झाली. कर्मचाऱ्यांची संख्या वाढू लागली तसं योग्य आणि चांगले कर्मचारी मिळवणं आणि ते टिकवून ठेवणं छोट्या शहरामध्ये कठीण होऊ लागलं. कंपनीनं 2010 मध्ये आपलं ऑफिस मदुराईमध्ये हलवलं. खरं तर या काळात बहुतेक कंपन्या चेन्नईमध्ये स्थलांतरित होत होत्या. पण मदुराईमध्ये (Madurai) ऑपरेटिंग कॉस्ट जवळपास 30 % हूनही कमी होती. कंपनी कॉर्पोरेट न होता एखाद्या कुटुंबाप्रमाणे असावी असे कंपनीच्या क्लाएंटचे प्रयत्न होते. “कर्मचाऱ्यांच्या मेहनतीवर असलेला आमचा विश्वास आणि त्यांच्या मेहनतीला आम्ही देत असलेला सकारात्मक प्रतिसाद या आमच्या जमेच्या बाजू होत्या. एखाद्या 2 टियर म्हणजे मदुराईसारख्या छोट्या शहरात जिथं प्रत्येक गोष्टीकडे फक्त व्यावसायिक दृष्टिकोनातूनच पाहिलं जातं, तिथं अशाप्रकारे एखादा समुदाय निर्माण होऊ शकत नाही हे आम्हाला माहिती होतं. मात्र तरी आम्ही मदुराई निवडलं, कारण तिथंच आमची नाळ जोडली गेली. तिथं आम्हाला हव्या असलेल्या सर्व गोष्टी होत्या, “ असं SMI चे संस्थापक आणि सीईओ एम.पी. सेल्वागणेश यांनी सांगितलं. मदुराईसारख्या शहरात असली तरी सध्या या कंपनीची वार्षिक उलाढाल 100 कोटी रुपयांच्या आसपास आहे. सेल्वागणेश यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात तिरुपूर इथल्या एका कापड गिरणीतून केली होती. त्यानंतर ते बेंगळुरुला आयटी क्षेत्रात गेले. ते सुरुवातीला IBM मध्ये रुजूही झाले. पण SMI ची स्थापना करण्यासाठी त्यांनी आपली नोकरी सोडली. “ कंपनीत उत्पादन व्यवस्थापक (Production Manager) म्हणून माझा कार्यकाळ हा मालकांच्या गुंतवणुकीपेक्षा जास्त नफ्याच्या अपेक्षा आणि कामगारांच्या जास्त पगाराच्या अपेक्षा यांचा मेळ घालण्यात गेला होता. त्या अनुभवाचा मला फायदा झाला. इथं आता मी क्लाएंट आणि कर्मचारी यांच्यात समन्वय साधतो, ” असं सेल्वागणेश सांगतात. कंपनीच्या अगदी पहिल्या दिवसापासूनच लग्नासाठीचा बोनस म्हणजे मॅरेज इन्क्रिमेंट या कंपनीत होतं. पण लग्न जुळवण्याची कल्पना नंतर आली. ” मला कर्मचारी भावासारखे मानतात. काही कर्मचारी खेडेगावांमधून आलेले आहेत. काहीजणांचे आईवडील म्हातारे आहेत किंवा त्यांना बाहेरच्या जगाचं फारसं ज्ञान नाही. त्यामुळे आपल्या मुलांसाठी योग्य जोडीदार शोधणं कठीण जातं. अशा कर्मचाऱ्यांना आम्ही मदत करतो. आमच्याकडे लग्न जुळवणाऱ्यांचं नेटवर्क आहे. त्यामार्फत मदत केली जाते. लग्न समारंभ हे एकत्र जमण्याचे उत्तम सोहळे असतात. आमची संपूर्ण टीम एकत्र येते. एखादी व्हॅन भाड्याने घेतली जाते आणि लग्नाला प्रत्येकजण हजेरी लावतो,” असं सेल्वागणेश सांगतात. वर्षातून दोनदा कंपनी प्रत्येक कर्मचाऱ्याला 6% ते 8 % पगारवाढ देते. 2021 मध्ये संपूर्ण आयटी क्षेत्रामध्ये कर्मचारी कंपनी सोडून जाण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं होतं. तेव्हाही कंपनीनं प्रत्येक तिमाहीमध्ये इन्क्रीमेंट देऊ केलं होतं. तसंच टॉप 40 किंवा टॉप 80 कर्मचाऱ्यांना विशेष कव्हरेजही दिलं गेलं. कोरोनानंतर Office सुरु झालंय? मग ऑफिससाठी Dress Code निवडताना ‘या’ चुका टाळा; वाचा सविस्तर खरं तर मदुराईमधील स्टार्टअप अशी ओळख असल्याने सुरुवातीला गुणवत्ता असलेल्या कर्मचाऱ्यांना आकर्षित करणं SMI ला अवघडच गेलं. त्यांच्या कंपनीशी नाळ जोडले जाणारे कर्मचारीच त्यांना हवे होते. फक्त तांत्रिकदृष्ट्या उच्चशिक्षित असलेले कर्मचारी त्यांना अजिबात नको होते. ‘कंपनीत कर्मचाऱ्यांची संख्या 200 होईपर्यंतचा काळ आमच्यासाठी खूप कठीण होता. अगदी सुमार कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही नोकरीत ठेवण्यात आलं; पण त्यामुळेच त्यांच्या कामात नंतर चांगलीच सुधारणा झाली. हळूहळू सर्व टीम स्थिरस्थावर झाल्यावर आम्ही त्यांच्याकडून व्यावसायिकदृष्ट्या अत्युत्तम कामगिरीची अपेक्षा केली आणि त्याचे परिणाम अत्यंत चांगले मिळाले,’ असा अनुभव सेल्वागणेश यांनी सांगितला. सेल्वा गणेश म्हणाले, “आमच्याकडे गेली अनेक वर्षे काम करणारे काही कर्मचारी आहेत. पण ते आमची कंपनी सोडून इतर कुठेच कधीच जाणार नाहीत असं मात्र आपण गृहीत धरू शकत नाही. त्यांच्या मनात ही कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत जाण्याचे विचार येण्याआधीच आम्ही त्यांचे भत्ते देऊन टाकतो. कर्मचाऱ्यांना कोणतीही अडचण आली तर ते थेट माझ्याशी संपर्क साधतात. असं नातं निर्माण करण्यासाठी पैसा आणि वेळ या दोन्हीची गुंतवणूक लागते आणि त्याशिवाय तुमचा दृष्टीकोनही प्रामाणिक असणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट व्यावसायिक दृष्टीकोनातूनच बघणं उपयोगाचं नाही.” मात्र जबाबदारी, दायित्व आणि खर्चावर नियंत्रण हेही महत्त्वाचं आहेच. “दरवर्षी अगदीच सुमार कामगिरी करणाऱ्या 4% ते 5% कर्मचाऱ्यांना आम्ही बाहेरचा रस्ता दाखवतो. स्वत:हून कंपनी सोडणाऱ्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. बहुतेक वेळेस लग्न झाल्यामुळेच महिला कर्मचारी कंपनी सोडतात. हे सगळं जरी असलं तरीही कंपनी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचं प्रमाण आमच्याकडे अजूनही 13 %पेक्षा कमीच आहे, ” असं सेल्वा गणेश यांनी सांगितलं. अर्थातच कंपनीतील वरिष्ठांचे कर्मचाऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असले आणि व्यावसायिक दृष्टिकोनाच्या पलीकडे जाऊन माणुसकीचं नातं जपलं गेलं तर काय होऊ शकतं हेच SMI च्या उदाहरणावरून स्प्ष्ट दिसतंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.