जाहिरात
मराठी बातम्या / देश / वयाच्या 7 व्या वर्षी बालविवाह, 12 वर्षांनंतर कोर्टाच्या निर्णयामुळे तरुणीला मिळालं स्वातंत्र्य

वयाच्या 7 व्या वर्षी बालविवाह, 12 वर्षांनंतर कोर्टाच्या निर्णयामुळे तरुणीला मिळालं स्वातंत्र्य

वयाच्या 7 व्या वर्षी बालविवाह, 12 वर्षांनंतर कोर्टाच्या निर्णयामुळे तरुणीला मिळालं स्वातंत्र्य

या तरुणीचा पती निरक्षर आहे तर ती सध्या BA चं शिक्षण घेत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

जोधपूर, 04 सप्टेंबर : वयाच्या सातव्या वर्षी बालवधू बनलेल्या मुलीचा बालविवाह (Child Marriage) तब्बल 12 वर्षांनी न्यायालयाने रद्द ठरवला. मानसी नावाच्या या मुलीला वयाच्या 19 व्या वर्षी न्याय मिळाला आहे. मात्र, मागील 12 वर्षे तिला समाज, जात पंचायत आणि सासरच्या लोकांच्या दबावाला आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. अखेर देशात बालविवाह रद्द करण्यासाठी मोठी चळवळ उभी करणाऱ्या सारथी ट्रस्टच्या डॉ. कृती भारती यांच्या मदतीने मानसीने अखेर न्यायालयीन संघर्षात विजय मिळवला. न्यायमूर्ती खत्री यांनी मानसीला बालविवाहातून मुक्त करत असल्याचा निर्णय दिला. वयाच्या सातव्या वर्षी बालविवाहाच्या (Child Marriage) अनिष्ट प्रथेला बळी पडलेल्या मानसीला तब्बल 12 वर्षांनंतर या विवाहापासून सुटका मिळाली आहे. राजस्थानातील भीलवाडाच्या कौटुंबिक न्यायालयात शुक्रवारी हा बालविवाह रद्द करण्यात आला. त्याचा आदेश शनिवारी जारी करण्यात आला. मानसीने जोधपूरच्या सारथी ट्रस्टच्या मदतीने भीलवाडा येथील विवाह रद्द करण्याची विनंती केली. अखेर, वयाच्या 19 व्या वर्षी मानसीला बालविवाहापासून स्वातंत्र्य मिळाले. बीए करत  असलेल्या मानसीला तिचा अभ्यास पूर्ण करून शिक्षिका व्हायचे आहे. देशात बालविवाह रद्द करण्याची मोहीम सुरू करणाऱ्या जोधपूरच्या सारथी ट्रस्टच्या व्यवस्थापकीय विश्वस्त आणि पुनर्वसन मानसशास्त्रज्ञ डॉ. कृती भारती यांनी सांगितले की, मानसी मूळ भिलवाडा जिल्ह्यातील पालडी येथील आहे. 2009 मध्ये मानसीचा बालविवाह बनेडा तहसीलमध्ये राहणाऱ्या तरुणासोबत झाला होता. तिला सुमारे 12 वर्षे बालविवाहाच्या प्रथेमुळे त्रास सहन करावा लागला. या काळात जात पंचावर आणि इतरांकडून गौना करण्यासाठी सतत दबाव होता (बालविवाहानंतर मुलगी वयात आल्यावर मुलीला तिच्या सासरच्या घरी आणण्याचा विधी). मानसीने तिच्या सासरच्या घरी जाण्यास नकार दिला. तेथून तिला धमक्या येत राहिल्या. तिचा नवरा सुशिक्षित नव्हता. तो काहीच काम करत नाही. हे वाचा -  SBI Report: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी! 50 लाख जणांना मिळू शकतो जॉब सारथीच्या पाठिंब्याने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला बालविवाह रद्द करण्याच्या डॉ. कृती भारती यांच्या मोहिमेबद्दल मानसीला कळले. तिने तिचा बालविवाह रद्द करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला. डॉ. कृती यांनी या वर्षी मार्चमध्ये भीलवाडाच्या कौटुंबिक न्यायालयात मानसीचा बालविवाह रद्द करण्यासाठी खटला दाखल केला. डॉ. कृती भारती न्यायालयात मानसीसह हजर झाल्या आणि त्यांनी लग्नाशी संबंधित वस्तुस्थितीची जाणीव करून देत हे लग्न रद्द करण्याची विनंती केली. यानंतर, कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश हरिवल्लभ खत्री यांनी मानसीचा 12 वर्षांपूर्वी अवघ्या 7 वर्षांच्या वयात झालेला बालविवाह रद्द करण्याचा निर्णय दिला. न्यायाधीश खत्री यांनी बालविवाहाच्या विरोधात समाजाला एक महत्त्वाचा संदेश दिला. बालविवाहाचे बंधन निष्पापांचा वर्तमान काळ आणि भविष्य दोन्ही खराब करते, असे ते म्हणाले. आतापर्यंत 43 बालविवाह रद्द देशातील पहिला बालविवाह जोधपूरच्या सारथी ट्रस्टच्या डॉ. कृती भारती यांच्या प्रयत्नांनी रद्द झाला. डॉ. कृती यांनी राजस्थानातील 43 जोडप्यांचे बालविवाह रद्द करण्याबरोबरच 1500 हून अधिक बालविवाह थांबवले आहेत. या कामासाठी त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. सीबीएसईच्या अभ्यासक्रमात डॉ. कृती यांच्या धाडसी मोहिमेचाही समावेश करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात