जाहिरात
मराठी बातम्या / देश / 'या' राज्यातील लोकांना लागलीये गाढवाच्या मटणाची चटक, होतीये बेसुमार कत्तल

'या' राज्यातील लोकांना लागलीये गाढवाच्या मटणाची चटक, होतीये बेसुमार कत्तल

'या' राज्यातील लोकांना लागलीये गाढवाच्या मटणाची चटक, होतीये बेसुमार कत्तल

देशात गाढवांची संख्या सातत्यानं कमी होत असून, 2012 पासून आतापर्यत गाढवांची संख्या 60 टक्क्यांनी कमी झाली आहे. 2019 मध्ये संपूर्ण देशात 1.2 लाख गाढवं होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

    नवी दिल्ली 24 फेब्रुवारी : देशात प्राण्यांबाबतचं क्रौर्य वाढत असल्याचं चित्र दिसत असून, याबाबत सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे. लोकांमध्ये पसरत असलेल्या गैरसमजांमुळे प्राण्यांच्या कत्तली वाढल्या असून, काही प्राणीजाती नामशेष होण्याच्या मार्गावर वाटचाल करत आहेत. सध्या आंध्र प्रदेशमध्येही (Andhra Pradesh) एरवी अतिशय दुर्लक्षित असणाऱ्या अशाच एका प्राण्यावर संक्रांत आली आहे. या प्राण्याचे मटण आरोग्यदायी असल्याचा गैरसमज पसरल्यानं तिथल्या लोकांमध्ये या प्राण्याच्या मटणाचे सेवन करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. बकरी, मेंढी, कोंबडीपेक्षा याचं मांस अनेक पटींनी महाग आहे, त्यामुळे मांस विक्री करणारे व्यापारीही हे मांस विकण्यावर भर देत असून, त्यासाठी या प्राण्याची बेसुमार कत्तल करण्यात येत आहे. त्यामुळं आंध्र प्रदेशातून हा प्राणी आता जवळपास दिसेनासा झाला आहे. एवढं महत्त्व आलेला असा कोणता प्राणी आहे, असा प्रश्न पडला ना? तर हा प्राणी आहे गाढव (Donkey). आंध्र प्रदेशात सध्या केवळ 5 हजार गाढवं उरली आहेत. देशात गाढवांची संख्या सातत्यानं कमी होत असून, 2012 पासून आतापर्यत गाढवांची संख्या 60 टक्क्यांनी कमी झाली आहे. 2019 मध्ये संपूर्ण देशात 1.2 लाख गाढवं होती. ओझी वाहण्यासाठी वापरला जाणारा हा प्राणी दिसायला तसा कुरूपच असल्यानं चेष्टेचाच विषय असतो. आयुर्वेदात गाढवीणीच्या दुधाचं आरोग्यदायी महत्त्व सांगितलं आहे; तरीही त्याचा वापर कठीण असल्यानं त्याचा सर्रास उपयोग केला जात नाही. आजतागायत मांसासाठी गाढवाचा विचारही कोणी केला नव्हता; पण आंध्रात गाढवाच्या मटणाला अवाजवी महत्त्व आल्यामुळे ही प्राणिजातच आता धोक्यात आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार**,** गाढवाचं मांस (Donkey Meat) खाल्ल्यानं शारीरिक सामर्थ्य (Strength) आणि उत्साह (Virility) वाढते, असा दावा केला जात आहे; मात्र असे कोणतेही वैद्यकीय पुरावे मिळालेले नाहीत. तरीही या गैरसमजामुळे आंध्रातील पश्चिम गोदावरी, कृष्णा, प्रकाशसम आणि गुंटूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये गाढवांची बेसुमार कत्तल झाली असून, चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कायदेशीररीत्याही ‘पशुखाद्य’ म्हणून गाढवाची नोंद नसल्यानं फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAAI) 2011 नुसार अशा प्राण्याची कत्तल करणं बेकायदेशीर आहे. त्यामुळं गुपचूप गाढवाची मांस विक्री केली जात आहे. अनेक गुन्हेगारी टोळ्याही यात सक्रिय झाल्या असून, परराज्यांतून गाढवांची तस्करी केली जात आहे. एक टोळी गाढवांच्या खरेदीचे व्यवस्थापन करते, तर दुसरी टोळी कत्तल आणि मांस वितरण करते. इतर मांस आणि दूध विक्रीपेक्षा यात अधिक पैसा मिळत असल्यानं हा गोरखधंदा तेजीत आला आहे. आता गाढवांच्या अशा बेकायदेशीर कत्तलीविरुद्ध प्राणीप्रेमी संघटनांनी आवाज उठवला असून, त्यांनी प्रशासनाकडं दाद मागण्यास सुरुवात केली आहे. याबाबत अधिक माहिती देताना काकीनाडा इथले अॅनिमल रेस्क्यू ऑर्गनायझेशनचे (ARO) सचिव गोपाल. आर. सुरबाथुला म्हणाले की, गाढवांच्या कत्तलीविरोधात अनेक तक्रारी प्रशासनाकडं करण्यात आल्या आहेत. आंध्र प्रदेशात गाढवांची संख्या कमी झाल्यानं राजस्थान, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमधून गाढवं आणली जात आहेत. संस्थेच्या कार्यकर्त्यानी मांस विक्री होत असलेल्या ठिकाणी अचानक भेट देऊन तिथले फोटो आणि व्हिडिओ काढून संबधित अधिकाऱ्यांकडे जमा केले आहेत. 22 फेब्रुवारी रोजी संस्थेनं वेमावल्लीवरिपेटाच्या पांडुरंगा रोड येथील गाढवांच्या बेकायदेशीर मांस विक्री आणि कत्तलीबाबत पश्चिम गोदावरी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे.’ ‘राज्य सरकारनं गाढवांच्या रक्षणासाठी वेळीच पावलं उचलणं आवश्यक असून, कायद्याची अंमलबजावणी करून गाढवांना जेवणाच्या ताटात संपवण्यापासून वाचवणं गरजेचं आहे. अन्यथा, गाढव पाहण्यासाठी लोकांना प्राणीसंग्रहालयात (ZOO) जावं लागेल,’ असंही सुरबाथुला यांनी सांगितलं. पश्चिम गोदावरी येथील पशुसंवर्धन सहसंचालक जी. नेहरू बाबू म्हणाले की, गाढवांची कत्तल करणे बेकायदेशीर असून या गुन्ह्यात सहभागी असलेल्या लोकांवर कठोर कारवाई केली जाईल. गैरसमजातून लोक गाढवाचं दुध आणि मांस खाण्याकडं वळत आहेत.’ गुंटूर शहर विभागाचे पोलिस महासंचालक आर. एन. अमी रेड्डी यांनीही गाढवांची कत्तल आणि मांस विक्री रोखण्यासाठी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात