काँग्रेसचे अध्यक्ष बनून राहुल गांधी पक्षाला संजीवनी देणार का?

काँग्रेसचे अध्यक्ष बनून राहुल गांधी पक्षाला संजीवनी देणार का?

काँग्रेसचे अध्यक्ष बनून राहुल गांधी पक्षाला संजीवनी देणार का? न्यूज18 लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांचा विचारप्रवृत्त करणारा परखड लेख...

  • Share this:

महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, न्यूज18 लोकमत

राजकारणात कधी कोणत्या प्याद्याची सरशी होईल हे जसे चाल चालणाऱ्याच्या बुद्धिकौशल्यावर आधारित असतं तद्वत, ते समोरच्या खेळाडूच्या चुकांवर देखील अवलंबून असतं. २०१४च्या निवडणुकीत जर काँग्रेसने नरेंद्र मोदी यांच्या उगवत्या नेतृत्वाला गांभीर्याने घेतले असते, त्यांच्या प्रत्येक कृतीचा अंदाज घेतला असता तर, ज्या अफाट बहुमताची अपेक्षा भाजप नेतृत्वही करीत नव्हते ते त्यांना मिळाले नसते. सत्तेचा अहंकार असणारे मणिशंकर अय्यर, दिग्विजय सिंग यांनी ज्याप्रकारे मोदी यांना 'चहावाला' म्हणून हिणवले, त्याचा सर्वसामान्य भारतीयांना नक्कीच राग आला असणार. काँग्रेसच्या अल्पसंख्याकांच्या अनुनयाला कंटाळलेल्या जनतेला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदींना 'मौत का सौदागर' म्हणून संबोधणे निश्चितच खटकले असणार. त्यामुळे जेव्हा मोदींसमोर काँग्रेसने राहुल गांधी यांना उभे केले, तेव्हा एक स्वकष्टाने पुढे आलेला लोकनेता विरुद्ध घराणेशाहीच्या बळावर मोठ्यामोठ्या बाता मारणारा राजपुत्र अशी विषम लढाई सुरू झाली होती. भारतीय समाज हा नेहमीच उपेक्षित, त्यागी आणि परखड बोलणाऱ्या लोकांचा आदर करतो. सोनियाजींच्या अनुभवातून काँग्रेसने त्याची प्रचिती घेतली होती. आपल्या पतीच्या निधनानंतर एक विदेशी महिला, भारतीय पोशाख परिधान करून, भारतीय भाषेत ज्यावेळी लोकांशी संवाद साधायची त्यावेळी काँग्रेससाठी एक सहानुभूतीची लाट उसळायची. त्यांच्या बोलण्याची, घराण्याची, पोशाखाची टिंगल करणाऱ्या राजकारण्यांना भारतीय जनतेने कधीच मताधिक्य दिलेले नव्हते. तो भारतीय मतदारांचा पिंडच नाही.

हा सारा ताजा इतिहास जाणणाऱ्या काँग्रेसच्या जाणकारांकडून एकापाठोपाठ चुका होत गेल्या, अर्थात त्याचा लाभ घेण्यासाठी टपलेल्या मोदींनी एकही संधी सोडली नाही. ते प्रत्येक सभेत लाखोंच्या संख्येने येणाऱ्या लोकांना विचारू लागले, या देशात पंतप्रधान होण्याचा मक्ता काय नेहरू-गांधी घराण्याचा आहे का? एक चहावाल्याचा मुलगा पंतप्रधानपदापर्यंत जाऊ शकत नाही का? आणि अगणित मुखांनी भारतीय लोक मोदींच्या प्रश्नांना होकारात्मक उत्तरे देऊ लागले होते. अहंकाराने धुंद झालेल्या काँग्रेस नेतृत्वाला कोट्यवधी भारतीयांचा तो हुंकार ऐकूच गेला नाही. गंमत म्हणजे, मोदींना लाभलेल्या जनतेच्या अफाट प्रतिसादामुळे राजकारणात स्थिरावू पाहणाऱ्या राहुल गांधी यांचा पत्ता कापला गेला. परिणामी पराभवाने कोसळून पडलेल्या काँग्रेसला उसळून उठण्यासाठी दोन-तीन वर्षे लागली. आज सत्तेत रमलेल्या भाजपने या वस्तुस्थितीकडे कानाडोळा करू नये. राजकारणात असो किंवा व्यक्तिगत जीवनात घटनांचे वर्तुळ कधी ना कधी पूर्ण होतच असतं. ज्या गुजरातेत आज निवडणुकीचे पडघम घुमतायत, तेथेच, २००२ ला भाजपने आक्रमक हिंदुत्वाची मुहूर्तमेढ रोवून काँग्रेसच्या जातीय समीकरणांची पारंपरिक चौकट मोठ्या ताकदीने उचकटून काढून फेकली होती.

अल्पसंख्याक समुदायाला सांभाळत राहिलात तर बहुसंख्य हिंदू सारे संस्कार विसरून रक्तसाक्षी होतात आणि राजकारण बदलते हे गुजरातेत दिसले आणि गावखेड्यातील आडदांड भारतीयांना आवडले म्हणून देशभर पसरले. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि सगळ्याच 'काऊ बेल्ट'मध्ये या आक्रमक हिंदुत्वाने काँग्रेसच्या जातीय गणितांची पाटी फक्त पुसलीच नाही तर फोडून टाकली आहे. कधी गोरक्षणांच्या नावाने, तर कधी धर्मरक्षणाचा पुकारा करत हे आक्रमक हिंदुत्व आजही देशभर आपले अस्तित्व दाखवताना दिसतंय. उत्तर भारतातील छोट्या गावाचा अखलाक असो नाहीतर 'पद्मावतीची भूमिका बजावणारी दीपिका, आक्रमक हिंदुत्वाची नजर जिथे पडते तिथे राडा होणारच. फरक फक्त एवढाच की आता सत्ता असल्याने, त्याला सरकारमान्य अधिष्ठान लाभलंय. तर या साऱ्या बदलाच्या वर्तुळाची ज्या गुजराथेत सुरुवात झाली, तेथेच नव्या राजकीय मन्वंतराची नांदी अवघ्या तीन-चार वर्षांतच घुमताना दिसतेय. पाटीदार, दलित, ओबीसी असे गुजरातच्या लोकसंख्येपैकी जवळपास ६०-७० टक्के लोक २२ वर्षांपासून सत्ताधारी असणाऱ्या भाजप सरकारविरोधात दंड थोपटताना दिसणे हा मोदी सरकारसाठी फार मोठा धक्का आहे. म्हणूनच असेल कदाचित स्वतः पंतप्रधान मोदी संसदेचे हिवाळी अधिवेशन गुंडाळून गुजरातेत ५० सभा घेणार आहेत. लोकांचा असंतोष शमवण्यासाठी प्रत्यक्ष मोदींना मैदानात उतरावे लागणे, याचा अर्थ मोदी-शहा हे या निवडणुकांकडे खूप गांभीर्याने पाहत आहेत. 'एक बूथ - 3० यूथ' अशी तरुणाईला सोबत घेणारी रणनीती आखून भाजप या लढाईत उतरलाय, त्याला किती यश लाभेल हे येणारा काळच सांगेल. पण राहुल गांधींच्या नेतृत्वात सुरू झालेला हा 'प्रयोग' जर गुजरातमध्ये थोडा तरी यशस्वी झाला तर, देशातील राजकारणाला वेगळे वळण लागू शकते. पण त्यासाठी राहुलबाबांनी आपल्या कामातील सातत्य कायम ठेवले पाहिजे. त्यांनी चांगल्या लोकांचा संपर्क वाढवला आणि चुकीच्या लोकांचा संसर्ग टाळला, तर त्यांच्या घोडदौडीला कोणीच लगाम घालू शकणार नाही.

समाज काळानुरूप बदलत असतो. तद्वत नेतृत्वही बदलत जाते. कधी समाजाच्या मुशीतून नेतृत्वाला आकार मिळतो तर कधी दूरदृष्टी असलेल्या कर्तबगार नेत्याच्या कर्तृत्वाने समाजाची जडणघडण होताना दिसते. आजच्या घडीला तरुणाई ज्या पद्धतीने बदलत आहे ते पाहता, एकंदर समाजाचा विचार करणारी तरुणांची फौज देश घडवण्यासाठी उभी राहणे आवश्यक आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वी सर्वप्रथम स्वामी विवेकानंदांनी भारतभूमीच्या सर्वंकष विकासासाठी तरुण पिढीला आवाहन केले होते. त्यांच्या हाकेला 'ओ' देऊन शेकडो उच्चशिक्षित तरुणांनी लौकिक सुखाकडे पाठ फिरवली. साधुत्व स्वीकारून, देश हाच देव आहे, दरिद्रीनारायणाची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे, असे मानून देशाच्या कानाकोपऱ्यात सेवाकेंद्रे उघडली. त्याच काळात महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या पूज्य ठक्कर बाप्पा, गिजुभाई बधेका, ताराबाई मोडक, अनुताई वाघ आदी निष्ठावंत समाजसेवकांनी आदिवासींच्या उद्धाराचे काम हाती घेतले. अगदी आरंभापासून महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणांचा देशातील सामाजिक बदलांवर खूप चांगला परिणाम होत होता. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी प्रस्थापित अभिजनवर्गाचा विरोध पत्करून सुरू केलेल्या सामाजिक कामामुळे महाराष्ट्राला विचारी बनवले. 'सुधारक'कर्ते आगरकर यांनी महाराष्ट्रातला विवेकाचे अधिष्ठान दिले. शाहू महाराजांनी लोककल्याणाचा आदर्श प्रत्यक्ष कृतीद्वारे शिकवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणातून संघटन आणि संघर्षाचा नवा 'पॅटर्न' यशस्वी करून दाखवला. या लोकोत्तर समाजसुधारकांनी अज्ञान-अंधश्रद्धेच्या जाळ्यात गुंतलेल्या गोरगरीबांना मुक्तीचा मार्ग दाखवला.

आजही भारताला अशा समाजसुधारकांची गरज आहे; कारण अंधश्रद्धेने गाव-खेड्यातील लोकांपासून नवश्रीमंत मडळींपर्यंत सगळ्यांनाच ग्रासले आहे. बुवा, बाबा आणि माताजींच्या भंपक विचारांनी टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून थेट घरातच शिरकाव केला आहे. त्यामुळे तरुणाई सिद्धिविनायकाच्या रांगांमध्ये आणि शिर्डीच्या पदयात्रांमध्ये रमलेली दिसते किंवा व्यसनांच्या विळख्यात अडकलेली दिसते. या युवाशक्तीला बेरोजगारीच्या जाचाने गुन्हेगारीच्या आश्रयार्थ जावे लागते तर फसव्या तत्त्वज्ञानांच्या भूलथापा त्यांना नक्षलवाद किंवा दहशतवादाच्या मार्गावर कसे नेतात, हेही पाहायला मिळते. हे सारे थांबवण्यासाठी देशात बुद्धिवादी आणि विवेकी विचारसरणी विकसित झाली पाहिजे. ते काम फक्त सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या काँग्रेसच्याच माध्यमातून होऊ शकते, असे मानणारा मोठा वर्ग आपल्याकडे आहे. परंतु २०१४च्या लोकसभा निवडणुकांनंतर ज्या पद्धतीने मोदीलाटेने देशातील राजकीय वातावरण बदलून टाकले, त्यामुळे जुन्या काँग्रेसजनांचा आत्मविश्वास पार ढासळून गेला होता. प्रचंड मताधिक्यानं दिल्लीत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने गेल्या साडेतीन-चार वर्षांत जे निर्णय घेतले त्याने भारतीय अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण अक्षरश: घुसळून निघालेले आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी फक्त राहुल गांधी हेच समर्थ आहेत.

नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेशातील निवडणुकीत राहुल गांधी यांचे नेतृत्व पणाला लागले होते. त्या निवडणुकीत 'टीम राहुल' प्रथमच सक्रियपणे लोकांसमोर आली होती; परंतु देशातील सर्वात मोठ्या उत्तर प्रदेशने 'टीम राहुल'ला पराभवाचा धक्का दिला. उत्तर प्रदेशातील पराभवाच्या या दुसऱ्या धड्यातून राहुल गांधी यांना देशातील धार्मिक आणि जातीय राजकारणाच्या गणिताची कल्पना आली असावी. कदाचित त्या अनुभवातूनच गुजरातमधील निवडणुकीत युवा वर्गाचा प्रतिभाशाली जोश आणि जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांचे अनुभव, याचे परिणामकारक रसायन तयार करण्याचा धडाका त्यांनी लावलेला दिसतोय. पाटीदार आंदोलनाचा शिल्पकार हार्दिक पटेल, मागासवर्गीयांचा नेता जिग्नेश मेवानी आणि ओबीसी नेता अल्पेश ठाकोर या त्रिमूर्तीला एकत्र आणण्यासाठी राहुल गांधी यांनी जी मेहनत घेतली, त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला निश्चितच झळाळी प्राप्त झालेली दिसते. २०१४च्या निवडणुकीतील 'पप्पू' म्हणून हिणवलं गेलेले राहुल गांधी गेल्या दोन महिन्यांपासून ज्या तडफेने गुजरातच्या निवडणुकीत उतरले आहेत त्याचा काँग्रेसला राष्ट्रीय पातळीवर निश्चितच फायदा होईल. त्यांच्या युवा नेतृत्वाचा जोश अवघ्या पक्षसंघटनेत ऊर्जा निर्माण करू शकेल. त्या जोरावर काँग्रेस गमावलेली पत आणि हरवलेला विश्वास पुन्हा प्राप्त करेल...

तसे पाहिले तर २०१४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने केलेल्या कामांना जर चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत नेले असते तर भ्रष्टाचाराविरोधात लोकक्षोभाचा भडका उडालाच नसता. पण आधुनिक पद्धतीने प्रचारयंत्रणा राबविण्यासाठी 'तयार' असणाऱ्या मोदी-शहांच्या आक्रमक रणनीतीने काँग्रेसचा सदाचारी चेहरा भ्रष्टाचारी आहे, हे लोकांच्या मनावर ठसवले. सोशल मीडिया, जाहिराती आणि आधुनिक माध्यम तज्ज्ञांना हाताशी धरून भाजपने प्रचाराचा धुरळा उडवून दिला होता. विशेष म्हणजे, १९९१ नंतर जन्माला आलेल्या तरुणाईला भारतीय राजकारणातील आणि आर्थिक विकासातील काँग्रेसचे योगदान फारसे ठाऊक नव्हते. त्यांना सोशल मीडियामधील भडक आणि भडकाऊ पोस्टमधून काँग्रेसविरोधी करण्यात ही प्रचारयंत्रणा यशस्वी ठरली. मग निवडणुकीतील पराभव सोपा बनत गेला. प्रत्यक्षात बघायला गेल्यास दहा वर्षांच्या सत्ताकाळात माहितीचा अधिकार देणारा 'आरटीआय'चा कायदाच नव्हे तर काँग्रेसने देशातील शेतकऱ्यांची 70 कोटी रुपयांची कर्ज माफ केली होती. जागतिक दडपण न जुमानता'मनरेगा'सारखी कोट्यवधी लोकांना जगायचे बळ देणारी योजना अमलात आणली होती. प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि अन्नसुरक्षा विधेयक याद्वारे प्राथमिक सुविधांना अग्रक्रम दिला होता. पायाभूत सुविधांसाठी खास प्रयत्न केले होते. मुख्य म्हणजे जगात आर्थिक मंदीचे चढ-उतार सुरू असताना मनमोहन सिंग सरकारने देशाचे सुकाणू अत्यंत कुशलतेने सांभाळले होते. पण यूपीए-२ च्या काळात माजलेला आणि गाजलेला 'भ्रष्टाचार' काँग्रेसची बरबादी करणारा ठरला होता. भाजपने हा ताजा इतिहास विसरू नये.

First published: November 20, 2017, 7:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading