मुंबई, 15 जुलै : पतीपासून वेगळं राहत असलेल्या पत्नीनं मंगळसूत्र काढून टाकणं (Removal of Mangalsutra), ही गोष्ट पतीचा मानसिक छळ करणारी असून शकते, असे मत मद्रास उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. न्यायालयानं या आधारावर पीडित पतीचा घटस्फोट मंजूर केला आहे. ‘गळ्यातलं मंगळसूत्र काढणं हे विवाह संपुष्टात आणण्यासाठी पुरेसं आहे असं आम्ही म्हणत नाही. मात्र, पत्नीने केलेलं कृत्य हा एक मोठा पुरावा आहे. विभक्त होताना मंगळसूत्र काढण्याचं पत्नीचं कृत्य, आणि रेकॉर्डवर उपलब्ध असणारे इतर पुरावे यातून दोघांनाही हा विवाह पुढे सुरू ठेवायचा नाही हे सिद्ध होतं,” असं स्पष्ट करत न्यायालयाने पतीला घटस्फोट (Madras HC grants Divorce) मंजूर केला.जस्टिस व्ही. एम. वेलुमणी आणि एस. सौंथर यांच्या खंडपीठाने (Madras HC bench) हा निकाल दिला आहे. काय आहे प्रकरण? तामिळनाडूमधील इरोड येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या सी. शिवकुमार (C. Sivakumar) यांनी 15 जून 2016 साली स्थानिक कुटुंब न्यायालयाने दिलेला आदेश रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या कुटुंब न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटास नकार दिला होता. ‘द इंडियन एक्सप्रेस’नx याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. या वेळी महिलेच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, ‘हिंदू विवाह कायद्याच्या कलम 7 नुसार विवाहित स्रीने गळ्यात मंगळसूत्र घालणं हे अनिवार्य (Hindu Marriage Act) नाही. त्यामुळे पत्नीने मंगळसूत्र काढून टाकलं (Removal of Mangal Sutra) हे आपण खरं मानलं तरी त्याचा विवाहावर कोणताही परिणाम होत नाही.’ त्यावर, ‘कायद्यानं सक्ती नसली तरी आपल्याकडे लग्नामध्ये मंगळसूत्र (Mangalsutra) घालणं हा एक अत्यावश्यक विधी आहे हे सर्वांनाच माहिती आहे. पतीच्या मृत्यूनंतरच एखादी स्त्री मंगळसूत्र काढते.’ असे खंडपीठाने स्पष्ट केले. न्या. वेलूमणी यांच्या खंडपीठाने यावेळी दुसऱ्या एका खंडपीठाच्या निकालाचा संदर्भ दिला. ‘उपलब्ध पुराव्यांनुसार असं दिसत आहे, की पत्नीने मंगळसूत्र काढून ते बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलं आहे. आपला पती जिवंत असताना कोणतीही हिंदू पत्नी मंगळसूत्र गळ्यातून काढून ठेवणार नाही, हे सामान्यज्ञान आहे. महिलेच्या गळ्यात असलेलं मंगळसूत्र हे तिचं लग्न झालं असल्याचं प्रतीक आहे. केवळ पतीच्या मृत्यूनंतरच एखादी स्त्री आपल्या गळ्यातील मंगळसूत्र काढते. त्यामुळे या प्रकरणात पत्नीच्या या कृत्यामुळे पतीला मानसिक त्रास झाला असल्याची, आणि त्याच्या भावना दुखावल्याची शक्यता आहे.” असं या दुसऱ्या प्रकरणात निकाल देताना त्या खंडपीठाने म्हटलं होतं. याच आधारावर या प्रकरणातदेखील, पत्नीने गळ्यातील मंगळसूत्र काढणं ही पतीसाठी क्रूरताच (Removing Mangalsutra is Act of Cruelty) आहे असं न्यायमूर्ती वेलुमणी यांच्या खंडपीठाने म्हटलं आहे. तसंच, पत्नीने यापूर्वी आपल्या पतीचे त्याच्या महिला सहकाऱ्यांशी विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोपही केले होते. विद्यार्थी, सहकारी आणि पोलिसांसमोर तिने असे आरोप केले होते. हादेखील पतीसाठी मानसिक धक्का होता. दुसऱ्या व्यक्तींसमोर पतीवर असे बिनबुडाचे आरोप करणंदेखील क्रूरता असल्याचं न्यायालयाने म्हटलंय. कोरोनानंतर आणखी एका रोगाची दहशत; केरळमध्ये सापडला मन्कीपॉक्सचा पहिला रुग्ण ‘आमच्या असं निदर्शनास आलं आहे, की 2008 साली लग्न झालेले हे पती-पत्नी 2011 सालापासून वेगळे राहत आहेत. दरम्यानच्या काळात पत्नीने पुन्हा एकत्र येऊन संसार सुरू करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. उलट, तिने पतीचा वारंवार मानसिक छळ केला. त्यामुळे आम्ही आता या दोघांचा विवाह संपुष्टात आणण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.’ असं स्पष्ट करत हायकोर्टानं स्थानिक कोर्टाचा निर्णय बदलत, पतीला घटस्फोट मंजूर केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.