मध्य प्रदेशातील मंदसोर येथे साटं-लोटं पद्धतीत लग्न झालेल्या मोठ्या भावाने स्वत:च्याच सख्ख्या बहिणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या लग्न प्रथेनुसार दोन्ही कुटुंबावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असतो. जाणून घ्या या प्रथेविषयी…
साटं-लोटं या पद्धतीत एकाच कुटुंबातील बहीण-भावांचं दुसऱ्या कुटुंबातील भावा-बहिणीशी लग्न लावून दिलं जातं. अद्यापही अनेक ग्रामीण भागांमध्ये लाटं-लोटं या पद्धतीने लग्न लावून दिलं जातं.
अशा पद्धतीने लग्न करण्यामागे अनेक कारणं सांगितली जातात. पहिलं म्हणजे हुंडा टाळण्यासाठी ज्या घरातील मुलगी सून म्हणून आणली जाते, तर त्याच घरात आपली मुलगी दिली जाते.
दुसरं म्हणजे मुलीच्या माध्यमातून दोन्ही कुटुंब एकमेकांवर दबाव निर्माण करतात. उदाहरणार्थ जर एका कुटुंबातील मुलीला त्रास दिला गेला तर दुसऱ्या घरात दिलेल्या त्यांच्याच बहिणीचाही छळ केला जातो.
शहरांमध्ये साटं-लोटं पद्धतीने फारशी लग्न होत नसली तरी ग्रामीण भागात अद्यापही ही प्रथा रूढ आहे. विशेषत: महिलांना या पद्धतीचा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा इच्छा नसतानाही केवळ भावासाठी बहिणी लग्न करायला तयार होतात.
मध्य प्रदेशातील घडलेल्या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. कोणताही भाऊ आपल्या बहिणीवर बलात्कार कसा करू शकतो असा सवाल उपस्थित केला जात आहे. पत्नी रागाने सासरी निघून गेली म्हणून या भावाने स्वत:च्या बहिणीलाही तिच्या सासरहून आणलं आणि तिच्यावर सातत्याने बलात्कार केला.