गप्पांच्या नादात नर्सने एकाच व्यक्तीला दिले कोरोना लशीचे एकापाठोपाठ 2 डोस

गप्पांच्या नादात नर्सने एकाच व्यक्तीला दिले कोरोना लशीचे एकापाठोपाठ 2 डोस

एका व्यक्तीला पाच मिनिटांच्या अंतरानं कोरोना प्रतिबंधक लसीच्या (Corona Vaccine) दोन मात्रा देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

लखनऊ, 11 जून : एका व्यक्तीला पाच मिनिटांच्या अंतरानं कोरोना प्रतिबंधक लसीच्या (Corona Vaccine) दोन डोस देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेच्या माध्यमातून लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा दिसून आला आहे. देशात अनेक राज्यांमध्ये सध्या कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. अनेकांना कोरोना लसीच्या दुसऱ्या डोससाठी प्रतिक्षा करावी लागत असताना दुसरीकडं अशा प्रकारच्या घटना समोर येत आहेत.

ही घटना बुधवारी घडली आहे. लसीकरण केंद्रावर (Corona Vaccination) लस घेण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला लसीच्या दोन मात्रा पाच मिनिटांच्या अंतरानं देण्यात आल्या. संबंधित व्यक्तीनं ही घटना केंद्रावरील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळं घडल्याचा आरोप केला आहे. लसीकरणासाठी मी गेलो तेव्हा लस देणाऱ्या नर्स एकमेकींशी गप्पा मारत होत्या. गप्पा सुरू असतानाच त्यांनी मला जवळपास पाच मिनिटांमध्ये लसीचे दोन डोस दिले, असं या व्यक्तीचं म्हणणं आहे. केंद्रावर लस कशी दिली जाते याबाबत आपल्याला काहीच माहीत नव्हते, त्यामुळं आपण विरोध केला नसल्याचे त्यांनी सांगितले. हा सारा सावळा गोंधळ उत्तर प्रदेशमधील ललितपूर जिल्ह्यातील रावरपूर परिसरामधील एका लसीकरण केंद्रावर घडला.

लस टोचून घरी आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी लसीकरण केंद्रावर घडलेला प्रकार कुटुंबातील व्यक्तींना सांगितला. त्यानंतर त्यांना दोन डोस एकाच वेळी घ्यायचे नव्हते हे समजलं. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीच्या आधारे संबंधित व्यक्तीने मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांना संपर्क केला आणि यासंदर्भात तक्रार नोंदवली. त्यानंतर सध्या या व्यक्तीला आप्तकालीन वॉर्डमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आलीय. मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी नक्की काय घडलं, यासाठी जबाबदार कोण आहे यासंदर्भातील चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच घडलेल्या चुकीवर पडदा टाकण्याचाही त्यांनी प्रयत्न केला, लसीचे दोन डोस घेतल्यानं काही नुकसान होत नाही, असं त्यांनी सांगितलं.

हे वाचा - सिंहाच्या कळपात एकटी भिडली आई; सिंहिणीच्या जबड्यातूनही म्हशीने वासराला खेचून आणलं

कोरोना लसीकरणावरून गोंधळ होण्याचा हा उत्तर प्रदेशमधील पहिलाच प्रकार आहे असे नव्हे. या अगोदरही धक्कादायक प्रकार समोर आले होते. शामली जिल्ह्यात आरोग्य विभागाचा मोठा हलगर्जीपणा समोर आला होता. शामलीमध्ये तीन वृद्ध महिला कोरोना लस (Corona Vaccine) घेण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांना न विचारताच या वृद्ध महिलांना अ‍ॅन्टी रेबीज लस (Anti Rabies Vaccine) दिली. यानंतर यातील एका महिलेची प्रकृती बिघडली होती. तर बाराबंकीजवळील रामनगरमधील सिसौंडा गावामध्ये गावकऱ्यांनी लसीकरण पथकाला पाहून नदीत उड्या मारल्या होत्या. गावामध्ये लसीकरणासाठी आरोग्य पथक आल्याचं समजताच लस घ्यायची नसल्याने काही गावकऱ्यांनी चक्क शरयू नदीमध्ये उड्या मारल्या होत्या

Published by: News18 Desk
First published: June 11, 2021, 2:45 PM IST

ताज्या बातम्या