जाहिरात
मराठी बातम्या / देश / बिहारमध्ये केवळ 22 वर्षीय तरुण पत्रकाराची हत्या, नेमकं कारण काय? प्रेमाचा त्रिकोण की...

बिहारमध्ये केवळ 22 वर्षीय तरुण पत्रकाराची हत्या, नेमकं कारण काय? प्रेमाचा त्रिकोण की...

बिहारमध्ये केवळ 22 वर्षीय तरुण पत्रकाराची हत्या, 6 जणांना अटक

बिहारमध्ये केवळ 22 वर्षीय तरुण पत्रकाराची हत्या, 6 जणांना अटक

बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातले तरुण पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्ते (RTI Activist) बुद्धिनाथ झा (Buddhinath Jha) यांची हत्या झाल्याचं 12 नोव्हेंबर रोजी उघड झालं.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर:  बिहारच्या (Bihar) मधुबनी  जिल्ह्यातले तरुण पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्ते (RTI Activist) बुद्धिनाथ झा (Buddhinath Jha) यांची हत्या झाल्याचं 12 नोव्हेंबर रोजी उघड झालं. बनावट नर्सिंग होम्स (Fake Nursing homes) आणि बेकायदा हॉस्पिटल्सबद्दल ते त्यांच्या वेबपोर्टलवरून आवाज उठवायचे. 15 नोव्हेंबर रोजी ते या संदर्भातच कोणता तरी खुलासा करणार असल्याचं त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे सूचित केलं होतं. मात्र तत्पूर्वीच त्यांची हत्या झाली. या हत्येमागे नर्सिंग होम माफियांचा हात असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. पोलिसांना मात्र ही हत्या प्रेमाच्या त्रिकोणातून झाल्याचा संशय येत आहे. ‘आज तक’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. मधुबनी जिल्ह्यातल्या बेनीपट्टी (Benipatti) इथले रहिवासी असलेले बुद्धिनाथ झा अवघ्या 22 वर्षांचे होते. ते एका वेब पोर्टलमध्ये पत्रकार म्हणून कार्यरत होते. तसंच, माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणूनही काम करायचे. बनावट आणि फसवणूक करणाऱ्या नर्सिंग होम्सचं बिंग फोडणाऱ्या बातम्या ते त्यांच्या वेबपोर्टलवरून (Web Portal) सातत्याने देत होते. 15 नोव्हेंबर रोजी अशाच एका प्रकरणाला वाचा फोडणार असल्याचं बुद्धिनाथ झा यांनी फेसबुक पोस्टद्वारे जाहीर केलं होतं. ’ गेम विल रिस्टार्ट ऑन द डेट 15/11/21 (खेळ पुन्हा 15 नोव्हेंबरला सुरू होईल),’ अशी पोस्ट त्यांनी सात नोव्हेंबर रोजी फेसबुकवर केली होती. त्यानंतरच दोनच दिवसांत म्हणजे 9 नोव्हेंबर रोजी रात्रीपासून बुद्धिनाथ बेपत्ता झाले. 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यानंतर त्यांचा मोबाइल स्विच ऑफ झाला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. 12 नोव्हेंबर रोजी त्यांचा अर्धवट जळालेला मृतदेह उडन नावाच्या गावात मिळाला. हातातली अंगठी, गळ्यातली चेन आणि पायावर असलेला मस यांच्या आधारे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची ओळख पटवली. कुटुंबीयांनी त्यांच्या हत्येला खासगी नर्सिंग होम आणि हॉस्पिटल्सच्या संचालकांना जबाबदार धरलं आहे. पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये 9 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ते फोनवरून कोणाशी तरी बोलताना दिसत आहेत. माहिती अधिकाराचा वापर करून बुद्धिनाथ यांनी याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात बेनीपट्टी आणि धकजरीमध्ये अवैधरीत्या सुरू असलेल्या 19 पॅथॉलॉजी लॅब्जचा छडा लावला होता. त्यानंतर प्रशासनाने त्या लॅब्जवर कारवाई करून त्या बंद केल्या होत्या. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यातही बुद्धिनाथ यांनी लावून धरलेल्या विषयामुळे 9 बेकायदा नर्सिंग होम्स आणि लॅब्ज बंद झाल्या होत्या. हा इतिहास आणि त्यांची शेवटची फेसबुक पोस्ट यांच्या आधारे बुद्धिनाथ यांच्या हत्येच्या संशयाची सुई नर्सिंग होम्स माफियांकडे वळते आहे. पोलिसांना मात्र या प्रकरणात प्रेमत्रिकोणाचा संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेसह सहा जणांना अटक केली आहे. कला देवी, रोशन कुमार, बिट्टू कुमार, दीपक कुमार, पवन कुमार, मनीष कुमार अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. चौकशीदरम्यान कलादेवीने बुद्धिनाथ झा यांच्यावर प्रेम असल्याचं कबूल केल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसंच, पवन कुमार कलादेवीवर प्रेम करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसरा आरोपी रोशन बेनीपट्टीमध्ये पॅथॉलॉजी लॅब चालवत होता. त्याचं बुद्धिनाथशी भांडण सुरू होतं. बुद्धिनाथ त्याला सातत्याने धमकावत होता. बुद्धिनाथची स्वतःची लॅब बंद झाली होती आणि तो रोशनला त्याची लॅब बंद पाडण्याची धमकी देत होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या व्यक्तिगत कारणांमुळे पवन आणि रोशन यांनी मिळून बुद्धिनाथला रस्त्यातून दूर केलं. अधिक तपासानंतर या प्रकरणामागचं सत्य पुढे येऊ शकेल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात