मुंबई, 08 ऑगस्ट: परदेश प्रवासासाठी व्हिसा काढणं हे कठीण काम असतं. व्हिसाची फी, त्यासाठीची भरमसाठ कागदपत्रांची पूर्तता आणि इतकं करूनही व्हिसा मिळेल याबाबत खात्री नसणं या अतिशय त्रासदायक गोष्टी आहेत. युरोपातल्या शेंगेन प्रदेशात जाण्यासाठी आवश्यक असलेल्या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या एका युझरने ट्विटरवर या संदर्भातला एक खूप बोलका फोटो शेअर केला आहे. प्रकाश सप्तर्षी नावाच्या ट्विटर युझरने कागदपत्रांची चळत असलेला एक फोटो त्याच्या अकाउंटवर शेअर केला आहे. हा फोटो ट्विटरवर खूप व्हायरल झाला आहे. या फोटोला आतापर्यंत 4K हून लाइक्स मिळाले आहेत. अनेकांनी या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हा फोटो रिट्वीट करून त्यावर आपलं मत मांडलं आहे. एखाद्या देशात जाण्यासाठी व्हिसा काढणं बंधनकारक असतं. शेंगेन हा युरोपीय महासंघामधल्या 26 देशांचा प्रदेश आहे. युरोपात फिरायला जाणारे अनेक पर्यटक हा व्हिसा काढतात. हा व्हिसा मिळाल्यास शेंगेन प्रदेशातल्या कोणत्याही देशात जाता येतं. तसंच या व्हिसावर 90 दिवस राहण्याची मुभा असते. त्यामुळे पर्यटक या व्हिसाला पसंती देतात. विद्यार्थी किंवा कामानिमित्त जास्त काळासाठी जाणाऱ्या नागरिकांना त्या त्या देशाचा राष्ट्रीय व्हिसा काढावा लागतो. व्हिसा काढण्याची प्रक्रिया क्लिष्ट असल्याचं अनेक जण सांगतात. हेही वाचा - इस्त्रोच्या नव्या SSLV-D1 चे यशस्वी प्रक्षेपण, पण संपर्क तुटला ट्विटरवर प्रकाश सप्तर्षी या युझरने शेंगेन व्हिसासाठी लागणाऱ्या कागदपत्रांचा फोटो शेअर केला आहे. “जगातल्या सर्वांत विकसित देशांपैकी एक असलेल्या देशामध्ये जाण्याकरिता टुरिस्ट व्हिसासाठी अर्ज करत आहे; मात्र तिथे राहण्यासाठी आणि परत येण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे आहेत, हे सिद्ध करायला मला इतकी कागदपत्रं सादर करावी लागणार आहे,” अशी कॅप्शन त्याने या फोटोसोबत लिहिली आहे. कागदपत्रांची ती चळत पाहून अनेक युझर्सनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Applying for a tourist visa to one of the most developed countries of the world. This is amount of paper I m supposed to carry to prove that I have the money to stay there and come back 🙃 pic.twitter.com/QInMzzJzsV
— Saptarshi Prakash (@saptarshipr) August 6, 2022
‘व्हिसा अर्जाची प्रक्रिया कशी असते, ते व्यवस्थित दाखवलं आहे,’ असं एका युझरनं म्हटलंय, तर भारत याबाबत डिजिटली पुढारलेला असल्याचं एकानं म्हटलंय. ‘कॅनडामध्ये एखादं खराब उत्पादन परत घेऊन जाण्यासाठी भारतातल्या प्रमाणे कोणी कुरिअरबॉय येत नाही. तिथे ग्राहकांनाच कंपनीला ते परत पाठवावं लागतं, असं मित्राकडून ऐकल्यावर धक्का बसला,’ असं एकानं लिहिलंय. हेही वाचा - चिनीचा उद्दामपणा 2 महिलांनी उतरवला! कोण आहेत ह्या दोघी? ज्यांच्या भेटीनंतर तैवान म्हणाला झुकणार नाही याबाबत काहींनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ‘परराष्ट्र मंत्रालयानं याबाबत काही धोरण ठरवलं पाहिजे. काही देशांचा असा कारभार खपवून घेऊ नये. भारताचा व्हिसा मिळवणंही त्यांच्यासाठी तितकंच कठीण केलं जावं,’ असं एकानं म्हटलंय. अनेकांनी याच पद्धतीचे अनुभव आल्याचं सांगितलं आहे. काही जणांनी याची खिल्लीही उडवली आहे. कागदांचा मोठा गठ्ठा म्हणजे स्विगीसाठी केलेल्या UPI व्यवहारांचं बँक स्टेटमेंट असेल, असं एकानं म्हटलंय. भारतातून अनेक जण परदेशात जातात. व्हिसा काढणं ही बऱ्यात अंशी तापदायक गोष्ट असल्याचा अनेकांचा अनुभव असतो. ते सूचित करणाराच हा फोटो असल्याने तो व्हायरल झाला तर त्यात नवल नाही.