नवी दिल्ली 23 मे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपच्या विजयाचं स्वागत केलंय. लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेलं ऐतिहासिक बहुमत म्हणजे राष्ट्रवादी शक्तींचा विजय असल्याचं संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. भारतातल्या कोट्यवधी जनतेने स्थिर सरकारसाठी पुन्हा एकदा मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला संधी दिल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. निवडणुकीच्या काळात आरोप-प्रत्यारोप होतात. कटुता निर्माण होते. आता निवडणूक संपली. प्रचाराच्या वेळी निर्माण झालेली कटुताही आता संपून जावी अशी भूमिकाही संघाने व्यक्त केलीय. हा विजय म्हणजे लोकशाहीचा विजय आहे. या विजयासाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले त्या सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे असं जोशी यांनी म्हटलं आहे.
RSS welcomes BJP's victory, calls it "triumph of national forces"
— ANI Digital (@ani_digital) May 23, 2019
Read @ANI story | https://t.co/LsCcl6to3c pic.twitter.com/eAk9HCTRpr
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही संघाने कौतुक केलंय. भारतातल्या या निवडणुकीने जगाला लोकशाहीचं दर्शन घडलं आहे. शांतता, सामाजिक सौहार्द कायम राहो आणि एका समर्थ भारताचं दर्शन जगाला घडो असंही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटलं आहे. देशातल्या सगळ्या एक्झिट पोल्सने जे अंदाज व्यक्त केले होते त्यापेक्षा जास्त जागा फक्त भाजपला मिळाल्या आहेत. एकट्या भाजपला 303 जागा मिळण्याचं जवळपास निश्चित झालंय. तर NDAच्या खात्यात 354 जागा मिळणार आहेत. काँग्रेसला फक्त 51 जागा मिळाल्या आहेत तर UPA 90 जागा मिळण्याचं निश्चित झालंय. तर इतरांना 98 जागा मिळाल्या आहेत.