Home /News /national /

लोकसभा निवडणुकीतल्या काँग्रेसच्या पराभवाची ही आहेत 8 मोठी कारणं

लोकसभा निवडणुकीतल्या काँग्रेसच्या पराभवाची ही आहेत 8 मोठी कारणं

काँग्रेसच्या प्रचाराचा आणि नेतृत्वाचाही लोकांवर प्रभाव पडला नाही. बेशिस्तीचा फटकाही काँग्रेसला बसला.

    नवी दिल्ली 23 मे : लोकसभेच्या सर्व 543 जागांपैकी 542 जागांचे कल जाहीर झाले आहेत. तर काही जागांचे निकालही घोषीत झाले आहेत. 542 जागांपैकी भाजपला 300 पेक्षा जास्त जागा मिळतील अशी शक्यता आहे NDAला 350 जागा मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत काँग्रेसने खूप जोर लावला होता. राहुल गांधी यांनी चांगली मेहेनतही घेतली मात्र त्याचं जागांमध्ये ते परिवर्तन करू शकले नाहीत. काँग्रेसला 50 च्या आसपास जागा मिळण्याची शक्यता आहे तर UPAला 90च्या आसपास जागा मिळतील अशी चिन्हे आहेत. काँग्रेसच्या पराभवाची ही आठ मुख्य कारणं असल्याचं सांगितलं जातंय. 1) प्रचाराचा लोकांवर प्रभाव नाही : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आक्रमकपणे प्रचार केला. राफेल खरेदीत भ्रष्टाचार झाला असं सांगत त्यांनी चौकिदार चोर है ही घोषणा दिली. ती लोकप्रियही झाली. मात्र त्याचा लोकांवर परिणाम झाला नाही. लोकांनी ज्या गांभीर्याने हे मुद्दे घ्यायला पाहिजे ते घेतले नाहीत असं निकालांवरून स्पष्ट होतं. 2) मोदींच्या तुलनेत प्रतिमा निर्मितीत अपयश : या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय कोण? असा प्रश्न कायम विचारला जात असे. राहुल गांधी आक्रमक झाले असले तरी एक खंबीर, मजबूत नेता म्हणून ते आपली प्रतिमा निर्माण करू शकले नाहीत. त्यामुळे लोकांनी राहुल यांच्यापेक्षा मोदींना पसंती दिली. 3) पक्ष शिस्तिचा अभाव : भाजपच्या तुलनेत काँग्रेसमध्ये कमालीचा शिस्तिचा अभाव होता. अनेक राज्यांमध्ये बंडाळी माजली होती. पक्षावर जी पकड पाहिजे ती पकड राहुल गांधी निर्माण करू शकले नाहीत. महाराष्ट्रात विरोधीपक्ष नेत्याच्या मुलानेच भाजपमध्ये प्रवेश केला. अनेक महत्त्वाचे नेते काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले. पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरुद्ध नवज्योतसिंग सिद्धू असा वाद रंगला होता. 4) मोदींच्या रणनीतीत काँग्रेस अडकली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय चाणाक्षपणे प्रचाराची रणनीती तयार केली होती. काँग्रेसच्या प्रत्येक आरोपाला त्यांनी ठामपणे उत्तरं दिली आणि मतदानाच्या प्रत्येक टप्प्याप्रमाणे मुद्दे उपस्थित केले. त्या जाळ्यात काँग्रेस ट्रॅप झाली. मोदींच्या प्रचाराच्या मागे त्यांना फरफटत जावे लागले. 5) साधन सामुग्रीचा अभाव : पाच वर्ष सत्तेपासून दूर राहिल्याने काँग्रेसला साधन सामुग्रीची चणचण होती. दिर्घकाळच्या सत्तेमुळे नेते श्रीमंत झाले मात्र सत्ता गेल्यानंतर पक्षाला त्यांनी रसदपुरवढा केला नाही. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळविल्यानंर थोडी फार आर्थिक मदत झाली. त्याच बळावर काँग्रेसने निवडणुकीचं नियोजन केलं. 6) अती आत्मिश्वास नडला : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या विधानसभेतल्या विजयाने पक्षाचा आत्मविश्वास वाढला. त्यामुळे काँग्रेसने जी काळजी घ्यायला पाहिजे ती घेतली नाही. आता आपल्याला लोकांनी पसंती दिली असं त्यांना वाटायला लागलं आणि इथेच घात झाला. 7) आघाडी न करणं नडलं : काँग्रेसने उत्तर प्रदेश आणि नवी दिल्लीत इतर पक्षांशी आघाडी केली नाही. उत्तर प्रदेशात सपा आणि बसपाशी आणि दिल्लीत 'आप'शी आघाडी होईल असं वाटत होतं मात्र काँग्रेसने लवचिकपणा दाखवला नाही. त्याचा मोठा फटका काँग्रेसला बसला. 8) तळागाळात काम नाही : दिर्घकाळ सत्तेत राहिल्याने काँग्रेसला आंदोलनाची सवय राहिले नाही. गेल्या पाच वर्षात काँग्रेसच्या नेत्यांनी तळागाळात जाऊन लोकांशी जो संवाद साधायला पाहिजे तो संवाद काही काँग्रेसने साधला नाही. त्यामुळे पक्षाचा लोकांशी कनेक्ट तुटला. नवा मतदारही पक्षाकडे आकृष्ट करण्यास राहुल गांधींना अपयश आलं.
    First published:

    पुढील बातम्या