पूर्णिया, 8 जून : बिहारमधील एका रुग्णालयात डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. या निष्काळजीपणाने महिला रुग्णाचा जीव घेतला. निष्काळजीपणाची ही घटना पूर्णिया येथील आहे. इथे एका लेडी डॉक्टरने पाटणा येथून व्हिडिओ कॉल करून गर्भवती महिलेचे ऑपरेशन करण्यासाठी नर्सला बोलावले. परंतु ऑपरेशन दरम्यान नर्सने गर्भवती महिलेची नस कापली, त्यामुळे जास्त रक्तस्त्राव झाल्याने या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. यानंतर ऑपरेशन दरम्यान गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने संतप्त नागरिक आणि नातेवाईकांनी गोंधळ घातला आणि रास्ता रोको केला. या घटनेबाबत कुटुंबीयांनी सांगितले की, मालती देवी यांना दलाल आशाकर्मी यांनी समर्पण प्रसूती व शिशु रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टर नव्हते. नर्स आणि कंपाउंडरने डॉ. सीमाला बोलावले आणि त्यानंतर डॉ. सीमा यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑपरेशन आणि प्रसूती केली. दोन्ही मुले सुखरूप बचावली, मात्र गर्भवती महिला मालतीदेवी हिची नस कापली गेल्याने तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी व्हिडीओ कॉलद्वारे नर्सद्वारे या गर्भवती महिलेचे ऑपरेशन करून घेतले होते.
दरम्यान, या घटनेनंतर मोठा गदारोळ झाला होता. माहिती मिळताच नातेवाईकांनी डॉक्टरवर निष्काळजीपणाचा आरोप करत रास्ता रोको केला. माहिती मिळताच खजांची हाट पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तासाभराच्या प्रयत्नानंतर हा रास्ता रोको हटवला. या प्रकरणी आयएमएचे प्रतिनिधी डॉ सुधांशू कुमार म्हणाले की, महिलेचा मृत्यू कसा झाला हे शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल. तसेच रुग्णालयातील कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. नातेवाईकांनी खजांची हाट पोलीस ठाण्यात लेखी अर्ज देऊन डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. खजांची हाट पोलीस स्टेशनचे प्रभारी अनिल कुमार सिंह यांनी सांगितले की, कुटुंबाच्या तक्रारीनंतर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तसेच कुटुंबाचा अर्ज सिव्हिल सर्जनकडे पाठवला आहे, तेथून आलेल्या सूचनांनुसार कारवाई केली जाईल. सिव्हिल सर्जन जन डॉ. अभय प्रकाश चौधरी म्हणाले की, सध्या रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टर फरार आहेत. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल. दरम्यान, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.