केदारनाथ, 07 मे: हिंदूंसाठी महत्त्वाचं श्रद्धास्थान असलेलं एक मंदिर म्हणजे, केदारनाथ धाम. हिंदूंच्या चार धामांपैकी एक पवित्र ठिकाण. उत्तराखंडमध्ये रुद्र हिमालय पर्वतरांगेत तब्बल 12,000 फूट उंचीवर हे मंदिर आहे. आधी कोरोनामुळे आणि नंतर हवामानामुळे हे मंदिर (Kedarnath temple) बंद होतं. मात्र, शुक्रवारी (6 मे 2022) या मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले आहेत. यामुळे आता भाविकांना केदारनाथाचं दर्शन (Kedar Nath) घेता येणार आहे. तुम्हीदेखील जर केदारनाथ यात्रेला (Kedarnath Yatra) जाण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केदारनाथला हेलिकॉप्टर राईड कशी बूक करता येईल, त्याची टायमिंग्ज काय आहेत आणि तिकीट किती आहे या सर्व गोष्टींबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. मंदिरापर्यंत जाण्यासाठी हेलिकॉप्टरची सोय केदारनाथ मंदिरापर्यंत जाण्यासाठी थेट असा रस्ता उपलब्ध नाही. त्यासाठी सोनप्रयागपासून 18 किलोमीटर वर ट्रेकिंग करत जावं लागतं. यासाठी सुमारे दोन दिवस लागतात. इथलं हवामान आणि सरळसोट असा डोंगर यामुळे कित्येकांना मंदिरापर्यंत पोहोचताच येत नाही. यामुळे उत्तराखंड सरकारने, भाविकांना मंदिरापर्यंत जाता यावं यासाठी हेलिकॉप्टर सेवा (Kedarnath helicopter ride) सुरू केली आहे. यासाठी विविध कंपन्या एअर ट्रॅव्हल बुकिंगची सुविधा पुरवतात. पवन हंस, पिनॅकल एअर, हेरिटेज एव्हिएशन अशा कंपन्या या ठिकाणी हवाई ट्रॅव्हल सर्व्हिस देतात. पाच किंवा सात सीट असणारी ही हेलिकॉप्टर असतात. तुमचा ग्रुप मोठा असेल, तर तुम्ही संपूर्ण हेलिकॉप्टर बूक (Kedarnath Helicopter service) करू शकता. किंवा मग तुम्ही सीट बेसिसवर बुकिंग करू शकता. तसंच, तुम्हाला केवळ मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टर हवं असेल तर सिंगल वे; आणि जाण्या-येण्यासाठी हवं असेल तर राउंड ट्रिप असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. झी न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कुठून पकडाल हेलिकॉप्टर उत्तराखंडमधील फाटा, सरसी तसंच सीतापूर, गुप्तकाशी, देहराडून किंवा दिल्लीमधूनही तुम्ही केदारनाथसाठी हेलिकॉप्टर पकडू शकता. पवन हंस कंपनी फाटामधून हेलिकॉप्टर सुविधा पुरवते. यांच्याकडे Bell 407 आणि Ecureuil B3 ही सिक्स सीटर हेलिकॉप्टर्स आहेत. फाटा हेलिपॅड (Kedarnath Helicopter ride booking) हे गुप्तकाशीच्या पुढे आहे. तिथपर्यंत तुम्ही गाडीने आरामात पोहोचू शकता. सर्व हेलिकॉप्टर तुम्हाला केदारनाथ हेलिपॅडवर उतरवतील. हे हेलिपॅड मंदिरापासून सुमारे 700 मीटर अंतरावर आहे. सर्वांत जवळच्या हेलिकॉप्टर स्पॉटपासून केदारनाथ हेलिपॅड हे केवळ 8 मिनिटांच्या अंतरावर आहे. तिकीट किती आहे? एका दिवसात रिटर्न येण्यासाठी हेलिकॉप्टर कंपन्या एका सीटचे सुमारे 6,500 ते 8000 रुपये तिकीट दर (Kedarnath Helicopter ride ticket price) आकारतात. केवळ जाण्यासाठीचं सिंगल तिकीट सुमारे तीन ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत आहे. यासाठी तुम्ही हेलिकॉप्टर ऑपरेटर कंपन्यांच्या वेबसाईटवर जाऊन बुकिंग करू शकता. हेलिकॉप्टरची मागणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अॅडव्हान्स बुकिंग करूनच जाणे फायद्याचे ठरते. अॅडव्हान्स बुकिंग करण्याचं आणखी एक मोठं कारण म्हणजे उत्तराखंड सरकारने जारी केलेली नियमावली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केदारनाथला भेट देणाऱ्या भाविकांच्या संख्येवर निर्बंध लागू केले आहेत. नवीन नियमांनुसार (Rules for Char Dham Yatra) दिवसाला केवळ 12 हजार भाविक या ठिकाणी भेट देऊ शकतात. दरम्यान, उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेला येण्यासाठी कोरोना निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट किंवा लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य नसल्याचे जाहीर केलं आहे. त्यामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.