कर्नाटक, 17 एप्रिल: काल हनुमान जयंती (Hanuman Jayanti) असतानाच देशातील अनेक राज्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत. काल कर्नाटकातही (Karnataka) जमावाने दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. कर्नाटकातील हुबळी (Hubli, Karnataka) येथील जुन्या हुबळी पोलीस स्टेशनवर जमावाने दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एका निरीक्षकासह 4 पोलीस जखमी झाले आहेत. पोलीस आयुक्त लभु राम यांनी सांगितलं की, संपूर्ण शहरात कलम 144 (Section 144) लागू करण्यात आलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. जुन्या हुबळी पोलीस स्टेशनवर जमावाने दगडफेक केल्यानंतर कर्नाटकातील हुबळी शहरात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. काल रात्री झालेल्या या घटनेत चार पोलीस जखमी झाले आहेत. पोलीस ठाण्याबाहेर जमा झालेला जमाव अचानक हिंसक होऊन दगडफेक करत असल्याचे पाहून पोलिसांनी लाठीचार्ज केला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या. हनुमान मंदिर आणि रुग्णालयालाही केलं लक्ष्य मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह स्टेटस असलेल्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी करत जमावाने पोलीस स्टेशनबाहेर हिंसक निदर्शने केली. आंदोलकांनी जवळच्या हनुमान मंदिर आणि रुग्णालयावर दगडफेक केल्याचं वृत्त आहे.
Karnataka | A stone-pelting incident took place at Old Hubli Police Station, Hubli
— ANI (@ANI) April 16, 2022
Four policemen including one inspector injured. Section 144 imposed in the entire city. Investigation is underway & a case has been registered: Police Commissioner Labhu Ram pic.twitter.com/WbaGSUKdob
या घटनेची माहिती देताना पोलीस आयुक्त लभू राम म्हणाले, जुन्या हुबळी पोलिस ठाण्यावर दगडफेक झाल्याची घटना घडली असून त्यात एका निरीक्षकासह चार पोलिस जखमी झाले आहेत. संपूर्ण शहरात कलम 144 लागू करण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. काही दिवसांपूर्वी कोलारमध्ये झाला होता हिंसाचार कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातही काही दिवसांपूर्वी दगडफेकीची घटना समोर आली होती. रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर हल्लेखोरांनी दगडफेक केल्याने मुलबागल परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. वाढता हिंसाचार पाहून पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात कलम 144 लागू करून याप्रकरणी 5 जणांना अटक केली होती.