नवी दिल्ली, 13 जानेवारी : दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) तोंडावर रुमाल बांधून काही गुंडांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्याप्रकरणी आता मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. कारण या हल्ल्यात सामील असलेल्या एका तरुणीची ओळख पटवण्यात क्राईम ब्रँचला अखेर यश आलं आहे. संबंधित तरुणी ही दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थिनी असल्याचं समोर आलं आहे.
जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा देशभरातून निषेध करण्यात आला. चेहरा झाकून हातात रॉड घेऊन जर काही गुंड प्रवृत्तीचे लोक थेट विद्यापीठात घुसत असतील तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचं काय, असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी होत होती. या हल्ल्याच्या 8 दिवसांनंतर अखेर हल्ल्यात सामील असलेल्या तरुणीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आहे.
कोण आहे हल्लेखोर तरूणी?
जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला करणारे गुंड कॅमेरात कैद झाले होते. या गुडांमध्ये चेहरा झाकलेले एक तरुणीही दिसत होती. तसंच तिच्या हातात रॉडही होता. ही तरूणी दिल्ली विद्यापीठाच्या दौलत राम कॉलेजची विद्यार्थिनी असल्याचं समोर आलं आहे. या तरुणीला नोटीस पाठवून आता क्राईम ब्रँचकडून तिची चौकशी करण्यात येणार आहे.
मोठा खुलासा होणार?
जेएनयूमधील हल्ल्यानंतर डावे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांनी एकमेकांवर अनेक आरोप-प्रत्यारोप केले होते. हा हल्ला ABVP नेच केल्याचा डाव्यांचा दावा होता. त्यामुळे आता ओळख पटलेली तरुणी नेमकी कोणत्या गटाची आहे, हे चौकशीदरम्यान समोर येण्याची शक्यता आहे. तसंच या हल्ल्यातील इतर आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना मदत होण्याची शक्यता आहे.
JNUमध्ये नेमकं काय घडलं होतं?
5 जानेवारी रोजी जेएनमध्ये 40 ते 50 गुडांनी तोंडावर रुमाल बांधून प्रवेश केला होता. प्रवेश केल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. त्यात आइशा घोष ही विद्यार्थी नेताही जखमी झाली होती. या राड्यानंतर देशभर वादळ निर्माण झालं होतं. या गुंडांना अजून का अटक करण्यात आली नाही असा सवाल दिल्ली पोलिसांना करण्यात येत होता.
या हल्ल्याचं फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. या गुंडांच्या हातात लोखंडी रॉड आणि सळ्या होत्या. हे गुंड विद्यापीठात आलेच कसे असा सवाल करण्यात येत असून सरकार त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. त्यामुळे दिल्ली पोलीस या आरोपींना केव्हा अटक करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.