मन हादरून सोडणारा VIDEO, आजोबांच्या मृतदेहाशेजारी बसलेल्या नातवाचे दहशतवाद्यांपासून असे वाचवले जवानांनी प्राण

मन हादरून सोडणारा VIDEO, आजोबांच्या मृतदेहाशेजारी बसलेल्या नातवाचे दहशतवाद्यांपासून असे वाचवले जवानांनी प्राण

दहशतवाद्यांनी गस्त घालणार्‍या CRPFच्या ताफ्यावर हल्ला केला. या सगळ्यात एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

  • Share this:

श्रीनगर, 01 जुलै : जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) येथील सोपोरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) ताफ्यावर अतिरेक्यांनी हल्ला केला. यात सीआरपीएफ 179 बटालियनचे तीन जवान शहीद झाले असून, एका वयवृद्ध नागरिकाचादेखील गोळी लागल्यानं मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी गस्त घालणार्‍या CRPFच्या ताफ्यावर हल्ला केला. या सगळ्यात एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात गोळीबार सुरू असतानाच CRPFच्या जवानांनी एका 3 वर्षांच्या चिमुरड्याचे प्राण वाचवले आणि त्याला सुरक्षित स्थळी नेण्यात आले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चिमुरड्याचे वय 3 वर्ष असून, तो सकाळी आपल्या आजोबांसोबत बाहेर पडला होता. याच दरम्यान अचानक दहशतवाद्यांनी हल्ला केला. गोळी लागल्यानं या चिमुरड्याच्या आजोबांचा जागीच मृत्यू झाला. सोशल मीडियावर हा मुलाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुलगा रडताना दिसत आहे.

एका फोटोमध्ये हा चिमुरडा आजोबाच्या मृतदेहा शेजारीच बसलेला दिसत आहे. गोळीबाराच्या आवाजानं घाबरून गेलेला हा चिमुरडा सतत रडत होता. अखेर गस्त घालणाऱ्या एका जवानांनी या चिमुरड्याला उचलून गाडीत बसवले.

सोपोरमध्ये CRPF ताफ्यावर दहशतवादी हल्ला

वृत्तसंस्था ANIनं दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी CRPFची एक तुकडी गस्त घालण्यासाठी बाहेर गेली होती. या दरम्यान रेबन भागात CRPFच्या ताफ्यावर अचानक गोळीबार झाला. भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले, मात्र या हल्ल्यात 3 जवान शहीद झाल्याची माहिती आहे. सुरक्षा दलाची अतिरिक्त तुकडीही घटनास्थळी पोहोचली आहे. संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून शोध मोहीम राबविली जात आहे.

20 दिवसांत 36 दहशतवाद्यांचा खात्मा

यावर्षी जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी विरोधी मोहिमेत भारतीय जवानांनी तब्बल 110 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार केले.गेल्या 20 दिवसांत सुरक्षा दलाच्या 36 दहशतवाद्यांचा खात्मा केला. जम्मू-काश्मीर पोलिसांचे महासंचालक दिलबाग सिंह म्हणाले की, हे अतिरेकी लष्कर-ए-तोएबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित आहेत.

संकलन-प्रियांका गावडे.

First published: July 1, 2020, 1:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading