श्रीनगर, 07 ऑक्टोबर : जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी पहाटेपासून पुन्हा एकदा दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू झाली. शोपियांमधील सुजान सेक्टरमध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू होतं. त्याचं वेळी अचानक दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलाकडून या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. मंगळवारपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या झालेल्या या चकमकीत टॉप कमांडरसह 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आलं आहे. या परिसरात सुरक्षा दलाकडून सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. बुधवारी संध्याकाळपासून परिसरात सर्च ऑपरेशन सुरू होतं. ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एक म्होरक्या असल्याची माहिती मिळाली आहे.
#UPDATE | Two terrorists killed in an encounter with security forces in Sugan area of Shopian; operation still underway: Jammu and Kashmir Police https://t.co/NlwaxLjq3Y
— ANI (@ANI) October 7, 2020
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शोपियां जिल्ह्यातील झानपोरा भागातील सुजान या गावात अतिरेक्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने शोध मोहीम सुरू केली. घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला सुरक्षा दलाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर परिसरात दहशतवाद्यांच्या कुरापती सुरूच आहेत. सोमवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 2 जवान शहीद तर 3 जवान जखमी झाले होते.