जयपूर, 25 सप्टेंबर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे, यानंतर लगेचच राजस्थानमध्ये काँग्रेससाठी राजकीय संकट उभं राहिलं आहे. गहलोत गटाचे आमदार सचिन पायलट यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या विरोधात आहेत. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्यात येत असेल तर आपण सामूहिक राजीनामा देऊ, असा इशारा या आमदारांनी दिल्याचं वृत्त आहे. अशोक गहलोत यांच्या गटातील सगळे आमदार विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांच्या घरी जात असल्याची माहितीही समोर आली आहे. गहलोत गटातल्या 92 आमदारांनी राजीनाम्यावर सही केल्याचं आमदार प्रतापसिंग खाचरियावास यांनी न्यूज18 शी बोलताना सांगितलं आहे. याआधी काँग्रेस विधायक दलाच्या बैठकीसाठी दिल्लीहून पर्यवेक्षक म्हणून मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले, त्याआधी अशोक गहलोत दोन्ही पर्यवेक्षक थांबलेल्या हॉटेलमध्ये जाऊन त्यांना भेटले. या तिन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ बैठक चालली. यानंतर राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंग डोटासरा मुख्यमंत्री निवासस्थानी आले. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटही मुख्यमंत्री निवासस्थानी आले.
राजस्थान: कांग्रेस नेता और विधायक राजस्थान विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी के निवास पहुंचे।#Rajasthanpolitics https://t.co/PBWAOz3HUP pic.twitter.com/SzEToTqSz9
— ANI_HindiNews (@AHindinews) September 25, 2022
काँग्रेस विधायक दलाची बैठक संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार होती, पण 8.30 वाजेपर्यंत या बैठकीला सुरूवात झाली नाही. काँग्रेस आमदारांची एक वेगळी बैठक आमदार आणि मंत्री शांती धारीवाल यांच्या घरी सुरू आहे. अशोक गहलोत यांनी पुढच्या महिन्यात होणाऱ्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. अशोक गहलोत यांनी ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे राजस्थानमध्ये मुख्यमंत्री बदलला जाण्याची शक्यता आहे.