जयपूर 11 फेब्रुवारी : रॉबर्ट वाड्रा यांच्यामागे लागलेलं चौकशीचं शुक्लकाष्ठ संपण्याची काहीही चिन्हे नाहीत. मंगळवारी त्यांची ईडी पुन्हा चौकशी करणार आहे. बिकानेरजवळ घेतलेल्या एका जमीन घोटाळयाप्रकरणी ही चौकशी आहे. यासाठी रॉबर्ट हे सोमवारी दुपारीच जयपूरमध्ये दाखल झाले. त्यांच्यासोबत त्याच्या आई मॉरीन याही आहेत. लखनऊचा रोड शो झाल्यानंतर प्रियांका रात्री साडेआठ वाजता जयपूरमध्ये दाखल झाल्या. त्यासाठी त्या लखनऊवरून दिल्ली आणि तिथून थेट जयपूरला आल्या. रॉबर्ट आणि प्रियांका आणि त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांसाठी जयपूरमधल्या एका हॉटेलात सात खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. मंगळवारी ते हॉटेलातून थेट ईडीच्या ऑफिसमध्ये जाणार आहेत. बिकानेरजवळच्या कोलायत इथला हा घोटाळा असून ईडीने आत्तापर्यंत 1.82 कोटींची संपत्ती जप्त केलीय. 12 व्यक्ती आणि डॉफिन डेव्हलपर्स प्राइव्हेट लिमिटेड यांची ही संपत्ती आहे. या आधीही वाड्रांची चौकशी मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये रॉबर्ट वाड्रा यांच्या मागे लागलेला ईडीचा ससेमिरा काही थांबताना दिसत नाही. मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये आठवड्यामध्ये रॉबर्ट वाड्रा यांची तिसऱ्या दिवशी चौकशी करण्यात येत आहे. यापूर्वी देखील रॉबर्ट वाड्रा यांची ब्रिटनमधील मालमत्ता खरेदी संदर्भात चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, आज भारतातील संपत्ती विषयी चौकशी करण्यात येत आहे. यापूर्वी देखील रॉबर्ट वाड्रा यांची बुधवार आणि गुरूवारी चौकशी करण्यात आली होती. त्यामुळे रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये अटकेपासून दिलासा मिळावा याकरता वाड्रा यांनी पटियाला कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर त्यांना 16 फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून दिलासा देण्यात आला आहे. पण, याकाळात ईडीला सहकार्य करण्याचे आदेश देखील न्यायालयानं दिले आहेत. ‘राजकारण होतंय’ विरोधकांना नामोहराम करण्यासाठी भाजप सरकारी यंत्रणांचा वापर करत आहे. रॉबर्ट वाड्रा यांच्या चौकशीचा फार्स हा त्याचाच एक भाग असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. दरम्यान, मी माझ्या कुटुंबाच्या पाठिशी ठामपणे उभे आहे असं प्रियांका गांधी यांनी स्पष्ट केलं आहे. नुकताच प्रियांका गांधी यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.