मराठी बातम्या /बातम्या /देश /

‘वडिलांना किडनी देण्याची संधी मिळणं हे माझं नशीब!’ लालू प्रसाद यादवांच्या मुलीची भावनिक पोस्ट

‘वडिलांना किडनी देण्याची संधी मिळणं हे माझं नशीब!’ लालू प्रसाद यादवांच्या मुलीची भावनिक पोस्ट

Photo Credit - @RohiniAcharya2

Photo Credit - @RohiniAcharya2

लालू प्रसाद यादव यांच्यावर आज (5 डिसेंबर) सिंगापूरमध्ये किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणार आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • New Delhi, India

नवी दिल्ली, 5 डिसेंबर : वडील आणि मुलीच्या नात्यात एक वेगळ्याच प्रकारचा भावनिक ओलावा असतो. प्रत्येक मुलीसाठी तिचे वडील हे 'हिरो'च असतात. आपल्या या हिरोसाठी मुलगी काहीही करू शकते. मग ती मुलगी सामान्य कुटुंबातील असो किंवा प्रसिद्ध राजकारणी घराण्यातील. माजी केंद्रीय रेल्वे मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या धाकट्या मुलीनं हे सिद्ध करून दाखवलं आहे.

अनेक दिवसांपासून विविध आजारांनी त्रस्त असलेले आणि रुग्णालयात असलेले लालू प्रसाद यादव यांच्यावर आज (5 डिसेंबर) सिंगापूरमध्ये किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणार आहे. त्यासाठी त्यांची धाकटी मुलगी रोहिणी आचार्य आपली एक किडनी दान करणार आहे. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

रोहिणी यांच्याबाबत अनेकांना फार माहिती नव्हती. मात्र, जेव्हापासून त्यांनी आपल्या वडिलांना किडनी देण्याचा निर्णय घेतला आहे तेव्हापासून त्या चर्चेत आल्या आहेत. लालू यादव आणि राबडी देवी यांच्या नऊ अपत्यांमध्ये रोहिणी यांचा समावेश होतो. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या रोहिणी यांनी 2002 मध्ये यूएस स्थित सॉफ्टवेअर इंजिनिअर समरेश सिंह यांच्याशी लग्न केलं आहे. सध्या त्या सिंगापूरमध्ये राहतात. सिंगापूरमध्ये राहूनही त्या भारतातील राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा त्या राजकीय भाष्य करतात.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, लालू यादव रोहिणी यांच्या निर्णयावर नाराज होते. आपला जीव वाचवण्यासाठी मुलीची किडनी घ्यावी, अशी त्यांची इच्छा नव्हती. मात्र, रोहिणी यांनी त्यांची मनधरणी केल्यानंतर ते तयार झाले. रोहिणी आपल्या आई-वडिलांना देवाचा दर्जा देतात. वडिलांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली होती.

"या जगात मला आवाज मिळवून देणारे वडील माझ्यासाठी सर्वस्व आहेत. जर मी त्यांच्यासाठी माझ्या आयुष्यातील एक छोटासा भाग देऊ शकले तर मी स्वत:ला खूप नशीबान समजेन. आई आणि वडील हे या पृथ्वीवरील देव असतात. त्यांची सेवा करण्याचं कर्तव्य प्रत्येकानं पार पाडलं पाहिजे. माझे आई-वडील माझ्यासाठी देवाच्या ठिकाणी आहेत. मी त्यांच्यासाठी काहीही करू शकते. त्यासाठी तुमच्या शुभेच्छांनी मला अधिक बळ दिलं आहे. मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. मला सर्वांकडून विशेष प्रेम आणि आदर मिळत आहे. मी भावूक झाले आहे. मी तुम्हा सर्वांची मनापासून आभारी आहे," अशी पोस्ट डॉ. रोहिणी आचार्य यांनी लिहिली आहे.

कंगना रणौतसोबत झालेल्या वादामुळे आल्या होत्या चर्चेत

अभिनेत्री कंगना रणौतने गेल्या वर्षी भारतीय स्वातंत्र्याबद्दल एक वादग्रस्त विधान केलं होतं. 'भारताला 1947 मध्ये भीक म्हणून स्वातंत्र्य मिळालं होतं. खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं आहे,' असं ते वक्तव्य होतं. यावर रोहिणी आचार्य यांनी कंगनाची कानउघाडणी केली होती. त्या म्हणाल्या होत्या, "ती स्वातंत्र्याला भीक मानते. हजारो स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करते आणि अंध भक्तांप्रमाणे पापी लोकांची पूजा करते. झाशीची बनावट राणी असलेली कंगना मला देशद्रोही वाटते."

हेही वाचा - किडनी ट्रान्सप्लांट कसं होतं? एका Kidney वर सामान्य आयुष्य जगता येतं?

याशिवाय, गेल्या वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही रोहिणी आचार्य यांनी सरकारवर टीका केली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गंगा नदीत तरंगणाऱ्या मृतदेहांच्या छायाचित्रांमुळे त्यांनी सरकारवर टीका केली होती.

लालू प्रसाद यादव यांच्यासाठी बिहारमध्ये यज्ञाचं आयोजन - 

लालू प्रसाद यादव यांचा धाकटा मुलगा तेजस्वी यादव, मोठी मुलगी मीसा भारती आणि पत्नी राबडी देवी सिंगापूरला गेले आहेत. लालूंच्या उत्तम आरोग्यासाठी ठिकठिकाणी पूजा आणि यज्ञांचं आयोजनही करण्यात आलं आहे. पाटण्यात लालू यादव यांच्या समर्थकांनी काली मंदिरात त्यांचा फोटो ठेवून मंत्रोच्चारांसह यज्ञ सुरू केला आहे. दानापूरमध्ये लालू प्रसाद यांच्या प्रकृतीसाठी अनेक मंदिरांमध्ये प्रार्थना सुरू झाल्या आहेत. मंत्री आणि आमदारांनी मंदिरात लालूंचा फोटो लावून पूजा केली आहे. अनेक आरजेडी कार्यकर्त्यांनीही त्यात सहभाग घेतला आहे. या मंदिरात पूजा केल्यावर सर्व इच्छा पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे.

First published:

Tags: Health, Operation