Home /News /national /

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यामागे 'निवडणुका' आहे कारण? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यामागे 'निवडणुका' आहे कारण? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

या राजीनाम्यामागे भाजपचा अजेंडा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

    गुजरात, 11 सप्टेंबर : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी तडकाफडकी राजीनामा (Vijay Rupani Resign) देऊन सर्वांनाच धक्का दिला आहे. या राजीनाम्यामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. गुजरातमधला आपचा वाढता (AAP in Gujrat) प्रभाव पाहता, लवकरात लवकर पुढील निवडणूक घेण्याच्या दृष्टीने हा राजीनामा (Gujrat CM resign) दिल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. 'दैनिक भास्कर'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. गुजरात सरकारचा कार्यकाळ 2022च्या नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. मात्र, नोव्हेंबरऐवजी फेब्रुवारीतच गुजरातमध्ये निवडणुका (Gujrat Assembly Elections) घेण्याचा निर्णय भाजप घेऊ शकतं. याच दरम्यान उत्तर प्रदेशमध्येही निवडणुका (UP Assembly elections) होणार आहेत. त्यामुळे गुजरात आणि यूपीच्या निवडणुका एकदमच घेण्याची तयारी भाजप करत असल्याचं बोललं जात आहे. भाजपच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेचा कौल कुणाला असेल हे पाहण्यासाठी एक खासगी सर्वेक्षण (Survey) करण्यात आलं होतं. या सर्वेक्षणात असं दिसून आलं, की सध्या गुजरात काँग्रेसमध्ये (Gujrat congress) समन्वय आणि सक्रियतेचा अभाव आहे. तसंच, अंतर्गत वादांमुळे काँग्रेस खिळखिळी झाली आहे; मात्र आम आदमी पक्षाची गुजरातमधली कामगिरी काँग्रेसपेक्षाही चांगली (AAP can be threat to BJP) आहे. अशातच निवडणूक 2022 च्या डिसेंबरपर्यंत गेली तर ‘आप’च्या गोटात मोठे नेते जाण्याची शक्यता आहे. यामुळे मग भाजपला पुढील निवडणुकीत काँग्रेससोबतच 'आप'चाही (Gujrat AAP) सामना करावा लागण्याची शक्यता आहे. सध्या ‘आप’कडे गुजरातमध्ये कोणताही मोठा चेहरा नाही. 'आप'चा अजून जम बसला नाही आणि काँग्रेस बिकट परिस्थितीमध्ये आहे; त्यामुळे लवकर निवडणुका घेणं भाजपासाठी फायद्याचं ठरू शकतं. हे ही वाचा-BREAKING : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा तडकाफडकी राजीनामा रूपाणी सरकारला 5 वर्षं पूर्ण झाल्यानंतर ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला होता. या निमित्तानं बऱ्याच कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आले होते. यासोबतच गेल्या काही महिन्यांपासून गुजरातमध्ये विकासकामांचा धडाका सुरू आहे. कित्येक योजनांचं गेल्या महिन्यामध्येच उद्घाटन झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि मुख्यमंत्री रूपाणी (Rupani) यांच्या हस्ते कितीतरी योजनांचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. यासोबतच, महागाई भत्त्यामध्ये वाढ, सरकारी कार्यालयांमध्ये भरती असे निर्णयही याच काही दिवसांमध्ये घेण्यात आले आहेत. भाजपही ठिकठिकाणी पक्षाचे कार्यक्रम घेऊन संघटना मजबूत करत आहे. एकंदरीतच या सर्व गोष्टींमधून गुजरातमध्ये लवकरच निवडणुका (Gujrat elections in February) होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. उत्तर प्रदेशसोबत निवडणुका घेऊन त्याच लाटेत गुजरातमध्येही पुन्हा सत्ता मिळवण्याचा भाजपाचा मनसुबा असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत.

    First published:

    पुढील बातम्या