Home /News /national /

मराठी पंतप्रधानांची कमाल, कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी लिओ वराडकर पुन्हा झाले डॉक्टर

मराठी पंतप्रधानांची कमाल, कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी लिओ वराडकर पुन्हा झाले डॉक्टर

कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी लिओ वराडकर पुन्हा एकदा डॉक्टर झाले आहेत.

    डबलिन, 6 एप्रिल : चीनमधून सर्वत्र पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक देश युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र अशातच आयर्लंडचे पंतप्रधान आणि मूळ मराठी वंशाचे असणारे लिओ वराडकर यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी लिओ वराडकर पुन्हा एकदा डॉक्टर झाले आहेत. आयर्लंडमधील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून तिथं कोरोनाबाधितांची संख्या 5 हजाराच्या वर गेली आहे. या पार्श्वभूमीवर लिओ वराडकर यांनी कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी पुन्हा एकदा डॉक्टरांच्या पेशात रजिस्ट्रेशन केलं आहे. वराडकर हे पुढील एक आठवडा कोरोनाग्रस्तांचे उपचार करणार आहेत. वराडकर 7 वर्ष राहिले आहेत डॉक्टर सध्या आयर्लंडचे पंतप्रधान असलेल्या लिओ वराडकर यांनी 7 वर्ष डॉक्टर म्हणून काम केलं आहे. राजकारणात येण्याआधी ते डबलिन येथील सेंट जेम्स रुग्णालय आणि कोनोली रुग्णालयात ज्युनिअर डॉक्टर म्हणून काम करत होते. मात्र नंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. लिओ वराडकर आणि मराठी कनेक्शन लिओ वराडकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वराड या गावचे रहिवासी आहे. 2017 मध्ये ते आयर्लंडच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. लिओ यांचे वडील अशोक वराडकर 1960 साली भारतातून इंग्लंडला गेले. ते तिथंच स्थायिक झाले. त्यांनी तिथं आयरिश नागरिक असलेल्या मरियमशी लग्न केलं. लिओ यांचा जन्म हा आयर्लंडचा असला तरी त्यांचं मुळगाव हे वराड आहे. वराड गावात त्यांचं घर आहे. वराडकर यांनी आयर्लंड वाहतूक, पर्यटन आणि क्रीडा मंत्रीपद भूषवलं. तसंच ते आरोग्य मंत्री होते. 2017 मध्ये ते सिमोन केव्हीने यांना पराभूत करून पंतप्रधानपदी विराजमान झाले आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या