हेल्मेटशिवाय गाडी चालवणाऱ्यांना दंड आकारणारे पोलीस हे आता नित्याचं चित्र झालं आहे. महिला ट्रॅफिक पोलीसही हल्ली या कारवाईत सामील असतात.
पण ड्युटीवर असणाऱ्या महिला ट्रॅफिक पोलिसानं आपल्या पतीलाच बिनाहेल्मेट गाडी चालवताना पकडलं तर काय होईल हे हरयाणामधल्या झज्जरच्या रस्त्यावर पाहायला मिळालं.
झज्जरमध्ये स्थानिक पोलीस अधीक्षकांनी एक नवी मोहीम सुरू केली आहे. ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना ते गुलाबाचं फुल देऊन नियम पाळण्याचं आवाहन करतात.
या गांधीगिरी मोहिमेत गुरुवारी एक वेगळाच सीन झाला. जिथे ट्रॅफिक पोलिसांचं चेकिंग सुरू होतं, त्याच रस्त्यावरून एक महाशय हेल्मेटशिवाय जात असताना दिसले. लेडी पोलीसने त्यांना अडवलं तेव्हा दोघेही एकमेकांकडे बघून हसले.
पोलीस पत्नीने पतीलाच ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन करताना पकडलं होतं. तेव्हा गुलाबाचं फुल आणि चॉकलेट देऊन या पतीदेवांना गोड शब्दांत समजावलं गेलं आणि पुन्हा नियमाचं उल्लंघन न करण्याविषयी तंबी दिली गेली.