रिपोर्ट:अभिलाष मिश्रा इंदूर, 13 फेब्रुवारी : चांगल्या पगाराची नोकरी मिळवणं हे आजकाल बहुतांश तरुणांचं स्वप्न आहे. त्यातल्यात्यात अमेरिकेसारख्या देशात नोकरी मिळून स्थायिक होता आलं तर आयुष्य सेट होईल, असा विचार आजकालची तरुण मुलं-मुली करतात. पण, इंदूरमधील रुपाली जैनचं स्वप्न या सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. लाखो रुपयांचं मासिक पॅकेज असलेली अमेरिकेतील सॉफ्टवेअर इंजिनीअरची नोकरी सोडून रुपाली जैन माणुसकीची सेवा करण्यात व्यग्र आहे. रूपाली अमेरिकेतील नोकरी सोडून इंदूरला परतली. तिनं मानवसेवा हेच आपल्या जीवनाचं उद्दिष्ट बनवलं आहे. यासाठी तिनं पती आणि कुटुंबालादेखील कमी महत्त्व दिलं आहे. गरीब, असहाय्य आणि वृद्ध लोकांची सेवा करण्याचा निर्णय रुपालीनं घेतला आहे. सेवाभावी कामं तर अनेक संस्था करतात. पण, रुपाली जैन ज्या आत्मीयतेनं सेवा करते त्याची सर इतरांना नाही. वृद्धाश्रमात एखाद्याचा मृत्यू झाला की, त्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार, दशक्रिया आणि तेरावा यांसारखे विधी रुपाली करते. रुपालीनं आतापर्यंत 17 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. 2009 मध्ये घेतली मानवसेवेची प्रतिज्ञा - रुपाली सांगते की, 2009 मध्ये तिच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट आला. तेव्हा ती आपला मुलगा परम जैनचा चौथा वाढदिवस साजरा करण्यासाठी इंदूरमधील एका झोपडपट्टीत गेली होती. तेथील कुपोषित मुलांची स्थिती बघून ती एकदम सुन्न झाली. तेव्हाच तिच्या मनात गरीब आणि असहाय लोकांच्या सेवेसाठी आयुष्य समर्पित करण्याचा विचार आला. 2010 मध्ये रुपालीची कुंडलपूर तीर्थक्षेत्री आचार्य विद्यासागर यांच्याशी भेट झाली. तिने आचार्यांना तिची इच्छा सांगितली. आचार्यांनी तिला 24 पैकी 16 तास मानवसेवा करण्याचं व्रत करायला सांगितलं. तेव्हापासून रूपाली सातत्यानं समाजसेवेचं कार्य करत आहे. रुपालीनं सांगितलं की, तिच्या भिक्षेकरी केंद्रात सध्या 104 भिक्षेकरी आहेत. तिथे सर्वांची अतिशय चांगली काळजी घेतली जाते. तिनं आतापर्यंत 900 हून अधिक भिक्षेकऱ्यांना रेस्क्यू केलं आहे. हेही वाचा - UPSC साठी सोडली केंद्रीय मंत्रालयाची नोकरी, 6 वर्षांचा संघर्ष पण तिने करुन दाखवलं! सुमारे 650 व्यक्तींना घरी परतण्यात केली मदत - रुपाली सांगतात की, ज्या भिक्षेकऱ्यांची सुटका करण्यात आली आहे, त्यातील बहुतेकजण हे इंदूर बाहेरचे आहेत. ते भटकत इंदूरला आले होते. त्यांचं समुपदेशन केल्यानंतर त्यांची नावं व पत्ते घेण्यात आले. त्याच्या आधारे घराचा तपास लावून 500 जणांना त्यांच्या कुटुंबीयांकडे परत पाठवण्यात आलं आहे. 172 जण मनोरुग्ण होते. त्यांच्यावर अगोदर रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यातून बरे झाल्यानंतर 140 जणांच्या कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना घरी पाठवण्यात आलं. हे सर्व भिक्षेकरी देशाच्या विविध राज्यांतील होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.