नवी दिल्ली 30 जून : रेल्वे विभागाने देशातल्या सर्वच विभागांमध्ये गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केलाय. अनेक गाड्यांचे वेग वाढल्याने आणि तांत्रिक सुधारणा झाल्यामुळे हे बदल होत असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे. त्यामुळे आता प्रवासाचं नियोजन करताना या बदललेल्या गाड्यांचं वेळापत्रक पाहण्यास विसरू नका. रेल्वेच्या वेबसाईटवर हे वेळापत्रक देण्यात आलं आहे. प्रवाशांच्या सोईचा विचार करून हे नवं वेळापत्रक तयार करण्यात आल्याचं रेल्वेने म्हटलं आहे.
रेल्वे दरवर्षी 1 जुलैला आपल्या गाड्यांचं नवं वेळापत्रक जाहीर करतं. दरवर्षी त्यात किरकोळ बदल केले जातात. मात्र या वर्षी तब्बल 7 हजार गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय. रेल्वेने गेल्या काही दिवसांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे रेल्वेच्या वेगात 5 मिनिटींपासून ते साडेतीन तासांपर्यंत वेळेची बचत झालीय. गाड्यांचा वेग वाढल्यामुळे वेळेची ही बचत झाली. त्यातच अनेक नव्या गाड्या सुरू झाल्याने त्यांच्याही वेळा जुळवणं हे रेल्वेपुढचं मोठं आव्हान होतं. त्यामुळे सर्व 16 विभागांच्या गाड्यांमध्ये बदल करण्यात आलाय.
मुंबईतून देशातल्या जवळपास सर्वच भागांमध्ये रेल्वे गाड्या जातात. तर देशातल्या सर्वच भागांमधून मुंबईत रेल्वेगाड्या येतात. त्यामुळे मुंबईतल्या अनेक गाड्यांच्या वेळा बदलणार आहेत.
रेल्वेच्या काही पदांवर महिलांसाठी 50 टक्के आरक्षण
रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी महिलांना मोठी भेट दिलीय. त्यांनी एक घोषणा केलीय. भारतीय रेल्वेत 9 हजारांहून जास्त काॅन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर पदांवर भरती केली जाणार आहे. त्यात 50 टक्के जागा महिलांना दिल्या जातील. महिलांसाठी ही मोठी संधी आहे.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं होतं की सध्या भारतीय रेल्वेत 15.06 लाख कर्मचारी आहेत. त्यात 12.23 लाख कर्मचारी पे रोलवर आहेत. उरलेली 2.82 लाख पदं रिकामी आहेत. म्हणूनच त्यांनी पुढच्या दोन वर्षात 2.3 लाख पदं भरण्याची घोषणा केली होती.
1.31 लाख पदांवरच्या नवी भरतीचा पहिला टप्पा सरकारच्या आरक्षण नीतीप्रमाणे सुरू केला जाईल. यात जवळजवळ 19,715; 9,857 आणि 35,485 अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर मागासवर्गासाठी आरक्षित असेल.