नवी दिल्ली, 11 मार्च : एका भारतीय राजाची प्रेमकथा खूप सुंदर आहे. प्रेमासाठी त्याने केलेला पदाचा त्यागही तितकाच महत्त्वाचा देखील आहे. दक्षिण भारतातील पुडुकोट्टी या छोट्या संस्थानाचा राजा मार्तंड एका ऑस्ट्रेलियन तरुणीच्या प्रेमात पडला आणि त्यांनी तिच्याशी लग्न केलं. त्यावेळी देशात इंग्रजांची राजवट होती. भारतातील कोणत्याही राजा, सम्राटाने कोणत्याही परिस्थितीत परदेशी महिलेशी विवाह करायचा नाही, असा कडक नियम त्यांनी केला होता. त्यामुळे इंग्रजांना ही गोष्ट जेव्हा कळली तेव्हा त्यांना राजा मार्तंडचा खूप राग आला.
जर एखाद्या राजाने असं केलं असेल तर त्याला आपले सिंहासन गमवावे लागेल, हे स्पष्टच होतं. राजा मार्तंडसोबत नेमकं हेच घडलं. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाबाहेर घालवले. यामुळे राजा मार्तंड यांची पत्नीप्रती समर्पण आणि निष्ठा असलेली प्रेमकथा ब्रिटिशांच्या दबावाला बळी न पडण्याचे उत्तम उदाहरण ठरली.
राजा मार्तंड तोडिंयन बहादूर हे दक्षिण भारतातील पुडुकोट्टी या छोट्या संस्थानाचे शासक होते. ते एका ऑस्ट्रेलियन महिलेच्या प्रेमात पडले. राजा मार्तंड ऑस्ट्रेलियाला फिरण्यासाठी गेले असता तिथल्या एका हॉटेलमध्ये त्यांची सुंदर ऑस्ट्रेलियन तरुणी मॉली पिंक आणि तिच्या आईशी भेट झाली.
राजा मार्तंड पहिल्या नजरेतच या तरुणीच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी या तरुणीशी विवाह केला आणि त्यांच्या आयुष्यात अडचणी सुरू झाल्या. यामुळे त्यांना सिंहासनाचा त्याग करून फ्रान्समध्ये राहावे लागले. पण ते ब्रिटिशांच्या दडपणाखाली आले नाहीत. ते कोणत्याही परिस्थितीत आपल्या ब्रिटिश पत्नीला सोडण्यास तयार नव्हते. राजा तोडिंयन यांची ब्रिटिश पत्नी खूप सुंदर आणि आकर्षक होती.
राजाने पहिला विवाह भारतीय महिलेशी करावा अशी होती ब्रिटिशांची इच्छा
कोणत्याही भारतीय राजाने पहिला विवाह इंग्रज स्त्रीसोबत करू नये, असा त्यावेळी इंग्रजांचा नियम होता. जर एखादी इंग्रज स्त्री पहिली महाराणी बनली तर तिच्या पोटी जन्मलेले मूल गादीचा उत्तराधिकारी होईल. ती ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या समकक्ष असेल. यामुळे नवीन समस्या निर्माण होतील. म्हणूनच इंग्रज नेहमी भारतीय राजांना प्रथम भारतीय स्त्रीशी लग्न करण्यास सांगत जेणेकरून वारसा हक्काच्या मुद्द्यावर कोणतीही समस्या निर्माण होणार नाही.
राजाने मोडला होता एका अमेरिकी तरुणीसोबत झालेला साखरपुडा
1915 मध्ये, राजा मार्तंड हे 40 व्या वर्षीदेखील आकर्षक आणि अविवाहित होते. मी माझ्या देशातील कोणत्याही स्त्रीशी विवाह करणार नाही, असा त्यांनी निश्चय केला होता. तत्पूर्वी त्यांना एक अमेरिकी तरुणी आवडली होती. त्यांचा तिच्यासोबत साखरपुडा देखील झाला होता. पण ब्रिटिशांच्या दबावामुळे त्यांना साखरपुडा मोडावा लागला होता.
ऑस्ट्रेलियन तरुणीवर झाले फिदा
जेव्हा राजा मार्तंड एका हॉटेलमध्ये पहिल्यांदा मॉली पिंकला भेटले आणि तत्क्षणी त्यांना ती आवडली. मॉली ही संपन्न कुटुंबातील होती. तिचे वडील बॅरिस्टर होते. मॉली हुशार आणि सुंदर होती. मॉली आणि राजा मार्तंड एकमेकांच्या प्रेमात पडले.
ब्रिटिशांनी विवाहाच्या निमंत्रण पत्रिकाही छापून दिल्या नाहीत
मॉलीच्या आईला देखील राजा मार्तंड आवडले होते. राजाच्या विवाहाच्या प्रस्तावाला मॉलीच्या आईचा होकार होता. त्यानंतर हे दोघे पुडुकोट्टी संस्थानात आले. तिथे त्यांनी विवाह केला. संस्थानात मोठ्या धुमधडाक्यात विवाहसोहळा पार पडला. मात्र ब्रिटिशांनी या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकाही छापू दिल्या नाहीत. विवाहात अडथळे आणले. मात्र तरीदेखील राजाने विवाह केला. इंग्रजांना भारतीय राजांच्या परदेशी महिलांसोबत होत असलेल्या विवाहसोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका छापण्याबाबतही आक्षेप होता. राजा मार्तंडच्या बाबतीत ही तसंच घडलं. ब्रिटिशांनी या विवाहाला मान्यता देण्यास नकार दिला. पुडुकोट्टी हे संस्थान लहान असले तरी ईस्ट इंडिया कंपनीच्या जवळचे सहकारी होते.
इंग्रजांनी केला राणीवर विषप्रयोगाचा प्रयत्न
जेव्हा राजाची ऑस्ट्रेलियन पत्नी गर्भवती राहिली तेव्हा तिला दरबारात कोणीतरी विष पाजले होते.हे काम इंग्रजांच्या षडयंत्राचा एक भाग होता, असं मानलं जातं.
राजाला सोडावी लागली गादी
इंग्रजांचा विरोध इतका तीव्र होता की राणीसह राजाला परदेशात जावं लागलं. राणीने ऑस्ट्रेलियात पहिल्या अपत्याला जन्म दिला. राजाला आपले सिंहासन सोडावे लागले. त्यांनी उत्तराधिकारी म्हणून छोट्या भावाची नेमणूक केली. त्यानंतर इंग्रजांनी मार्तंड आणि मॉलीच्या मुलास खरा उत्तराधिकारी मानण्यास नकार दिला.
पत्नी आणि मुलासह राजा मार्तंड झाले फ्रान्समध्ये स्थायिक
1920 मध्ये मार्तंड त्यांची पत्नी आणि मुलासह फ्रान्समधील कान्समध्ये वास्तव्यास गेले. तिथल्या समाजात ते खास घटक बनले. तिथल्या पार्ट्यांमध्ये ते खास आकर्षण होते.राजाकडे अपार धनसंपत्ती होती. तसेच त्यांना त्यांच्या राज्याकडून पेन्शन म्हणून मोठी रक्कम मिळत होती. फ्रान्समधील मोठ्या व्यक्ती त्यांचे मित्र बनले होते.
भारतात अंत्यसंस्कार करण्यास केली मनाई
1928 मध्ये राजा मार्तंड यांचे निधन झाले. तेव्हा आपल्या पतीवर भारतातील पुडुकोट्टी संस्थानात अंत्यसंस्कार व्हावेत, अशी मॉलीची इच्छा होती. पण ब्रिटिशांनी त्यास परवानगी दिली नाही. त्यानंतर लंडनमध्ये राजा मार्तंड यांच्यावर हिंदू रितीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. लंडनमध्ये आजही राजा मार्तंड यांचे स्मारक आहे.
राजपुत्र बनला अमेरिकेचा नागरिक
राजाच्या निधनानंतर मॉली फ्रान्समध्ये वास्तव्यास होती. त्यानंतर ती लंडनमध्ये राहू लागली. पण कायद्याशी संबंधित अडचणींमुळे राजपुत्र अमेरिकेचा नागरिक बनला. 1967 मध्ये मॉलीचे कान्स येथे निधन झाले.
मुलाला करावा लागला अडचणींचा सामना
राजा मार्तंड यांच्या मुलाचे नाव मार्तंड सिडनी तोडिंयन असं होतं. आईशी मतभेद झाल्यावर तो अमेरिकेत निघून गेला. त्याने तिथलं नागरिकत्व घेतलं. पण 1945 मध्ये एका चोरीच्या आरोपाखाली त्याला एक वर्षाची शिक्षा झाली. मात्र इराणचे शाह पहलवी आणि क्युबाचे प्रमुख नेते त्याचे मित्र होते. यादरम्यान परिस्थिती अशी बनली की अमेरिकेने त्याचे नागरिकत्व काढून घेतले. मात्र ते त्याला परत मिळाले. पण तो 1948 मध्ये युरोपात परतला. आईच्या निधनामुळे तो तिच्या संपत्तीचा वारस असल्याने एक श्रीमंत व्यक्ती बनला आणि आनंदात आयुष्य जगू लागला. 20 जानेवारी 1984 रोजी इटलीतील फ्लॉरेन्स मधील एका अलिशान हॉटेलमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले.