मराठी बातम्या /बातम्या /देश /Indian Army Recruitment 2021: कोरोनामुळे Common Entrance परीक्षा स्थगित

Indian Army Recruitment 2021: कोरोनामुळे Common Entrance परीक्षा स्थगित

चाचण्यांबद्दल माहिती जाणून घेऊया.

चाचण्यांबद्दल माहिती जाणून घेऊया.

कोविड-19 परिस्थितीमुळे भारतीय लष्कराने सामायिक प्रवेश परीक्षा (CEE) 2021 पुढे ढकलली आहे.

    नवी दिल्ली,12 नोव्हेंबर:  कोरोना महामारीमुळे (Coronavirus Pandemic) देशावर मोठं संकट आलं आहे. याचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. कोरोनामुळे शालेय, तसंच भरतीसंदर्भातल्या परीक्षाही पुढे ढकलण्यात येत आहेत. भारतीय लष्कराची सामान्य प्रवेश परीक्षा (CEE) पुढे ढकलण्यात आली आहे. देशभरात कोव्हिडच्या संक्रमणामुळे ही चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय लष्कराने घेतला आहे. या संदर्भात भारतीय लष्कराने 12 नोव्हेंबर रोजी नोटीस जारी केली आहे. 'आज तक'ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

    जॉइन इंडियन आर्मी या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, सोल्जर जनरल ड्युटी (सोल जीडी), सोल्जर क्लार्क/स्टोअर कीपर टेक्निकल (सोल सीएलके/एसकेटी) आणि सोल्जर ट्रेड्समन या पदांसाठी 28 नोव्हेंबर 2021 रोजी होणारी सामान्य प्रवेश परीक्षा (CEE) कोरोनामुळे (COVID-19) आता त्या दिवशी होणार नाही. पुढची तारीख ठरेपर्यंत ही परीक्षा स्थगित (Indian Army Recruitment 2021 Cancelled) केली असून, नवी तारीख याच वेबसाइटच्या माध्यमातून कळवली जाणार आहे.

    लष्कराची भरती रॅली म्हणजे शारीरिक चाचणी परीक्षा असते. यामध्ये हजारो तरुण सहभाग घेतात. या परीक्षेतून पास झालेल्या तरुणांची सामान्य प्रवेश परीक्षा घेतली जाते; पण ती आता पुढे ढकलण्यात आली आहे. उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जाच्या आधारे सैन्य भरती मेळावा आयोजित केला जातो. सैन्यात भरती होण्यासाठी उमेदवारांना लष्कराच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करावी लागते. यानंतर सामान्य प्रवेश परीक्षेचं प्रवेशपत्र उमेदवारांना सैन्य भरती मेळावा होत असलेल्या ठिकाणीच दिले जाते. उमेदवारांना लेखी परीक्षेचं ठिकाण, तारीख आणि वेळ प्रवेशपत्राद्वारे कळवण्यात येते.

    देशभरात कोरोनाचा प्रसार झाल्याने सर्वच जण त्रस्त झाले आहेत. सातत्यानं वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे लॉकडाऊन, कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. आता हे निर्बंध शिथिल होऊ लागले असले, तरी त्याचा प्रतिकूल परिणाम सामाजिक, आर्थिक, तसंच अन्य बाबींवर होत आहे. या स्थितीच्या पार्श्वभूमीवर अनेक परीक्षा तहकूब करण्यात आल्या. कोरोना महामारीमुळे, भारतीय सैन्याने 2020-2021 मध्येही अनेक प्रवेश परीक्षा स्थगित केल्या आहेत.

    सैन्यातर्फे देशभरात विविध ठिकाणी विविध तळांवर भरती मेळावे आयोजित केले जातात. यातून उमेदवारांची निवड केली जाते. देशातल्या अनेक तरुणांना लष्करात नोकरी करण्याची इच्छा असते. भारतीय सैन्यात नोकरी मिळवून देशाची सेवा करणं ही अभिमानाची बाब आहे. लष्करात निवड झाल्यास देशसेवेत योगदान देता येऊ शकतं. देशसेवा करण्यासाठी अनेक जण लष्कराची परीक्षा देतात.

    First published:
    top videos