Home /News /national /

फाळणीत दुरावलेले भाऊ तब्बल 74 वर्षांनंतर भेटले; करतारपूर कॉरिडॉरला 'भरतभेट'

फाळणीत दुरावलेले भाऊ तब्बल 74 वर्षांनंतर भेटले; करतारपूर कॉरिडॉरला 'भरतभेट'

एकमेकांपासून दुरावलेल्या मुहम्मद सिद्दिकी (Muhammad Siddiqui) व हबीब ऊर्फ शैला (Habib) या दोन भावांची पाकिस्तानमधल्या करतारपूर येथे भेट झाली.

  नवी दिल्ली, 13 जानेवारी - एकमेकांपासून दूर राहणाऱ्या दोन भावांची (brothers), मित्रांची अनेक वर्षांनी भेट झाली, की वेगळाच आनंद अनुभवायला मिळतो. लहानपणी एकत्र राहणाऱ्या दोन भावांना पुढे नोकरीच्या, शिक्षणाच्या निमित्ताने एकमेकांपासून दूर जावं लागतं. मात्र जेव्हा ते प्रत्यक्षात भेटतात, त्या वेळचा आनंद वेगळाच असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच दोन भावांची गोष्ट सांगत आहोत, जे तब्बल 74 वर्षांनी एकमेकांना भेटले. 1947 साली भारत (India) आणि पाकिस्तानची (Pakistan) फाळणी झाली. त्या वेळी एकमेकांपासून दुरावलेल्या मुहम्मद सिद्दिकी (Muhammad Siddiqui) व हबीब ऊर्फ शैला (Habib) या दोन भावांची पाकिस्तानमधल्या करतारपूर येथे भेट झाली. त्या वेळी दोघांनाही आनंदाचे अश्रू आवरता आले नाहीत. 'आज तक'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. करतारपूर कॉरिडॉरमुळे शक्य 1947 साली झालेल्या भारत आणि पाकिस्तान फाळणीच्या वेळी मुहम्मद सिद्दिकी वयाने लहान होते. त्यांचे कुटुंब फाळणीत विभागलं गेलं. सिद्दिकी यांचा भाऊ हबीब ऊर्फ शेला फाळणीनंतर भारतातच वाढले. आता तब्बल 74 वर्षांनंतर करतारपूर येथे या दोघांची भेट झाली. करतारपूर कॉरिडॉर (Kartarpur Corridor) सुरू केल्यामुळे हे शक्य झालं आहे. कारण करतारपूर कॉरिडॉर हा भारत-पाकिस्तान सीमेशी जोडणारा भाग आहे. या माध्यमातून भारतातल्या व्यक्ती व्हिसा नसतानादेखील पाकिस्तानातल्या दरबारसाहिब गुरुद्वाराला जाऊ शकतात. नोव्हेंबर 2019 मध्ये हा कॉरिडॉर सुरू झाला.

  'पैसा नाही, लोकांसाठी काम करायचय'; पोलीस होण्यासाठी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडलेल्या मल्लिकाची कहाणी

  भेटीचा व्हिडिओ व्हायरल येथेच या दोन्ही भावांची भेट झाली असून, त्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहणाऱ्या व्यक्तीदेखील भावूक होऊन वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार, सिद्दिकी पाकिस्तानात फैसलाबाद येथे राहतात. त्यांचा भाऊ भारतात पंजाबमध्ये राहतो. करतारपूरमध्ये एकमेकांना पाहून हे दोघेही भावूक झाले. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. या वेळी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. करतारपूर कॉरिडॉर सुरू झाल्यामुळे ही भेट शक्य झाली. त्यामुळे दोन्ही भावांनी भारत आणि पाकिस्तान सरकारचे आभार मानले. देश विभागले मने नाही भारत आणि पाकिस्तानची फाळणी 1947 साली झाली. या फाळणीमुळे अनेक कुटुंबं विभागली गेली. या फाळणीवर आधारित विविध चित्रपटदेखील वेगवेगळ्या भाषेमध्ये आले आहेत. तसंच फाळणीच्या वेळी काय स्थिती झाली होती, यावर भाष्य करणारी वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकंही आहेत. फाळणीनंतर भारत-पाकिस्तान या दोन देशांतले संबंध बिघडत गेले. या दोन देशांमध्ये युद्धही झाली. आजही दोन देशांमधील संबंध फारसे चांगले नाहीत; पण एक जण भारतात, तर दुसरा पाकिस्तानात अशा दोन भावांची तब्बल 74 वर्षांनंतर भेट झाल्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक जण भावूक झाले.
  Published by:News18 Web Desk
  First published:

  Tags: Pakistan

  पुढील बातम्या