लडाख, 16 जून : भारत आणि चीन (India-China) दरम्यान पूर्व लडाख (Eastern Ladakh) जवळच्या सीमा रेषेवर गेल्या महिनाभरापासून संघर्ष सुरू आहे. दरम्यान, चिनी सैन्य आणि भारतीय सैन्यामध्ये आज झालेल्या चकमकीत कर्नलसह दोन जवान शहीद झाले आहेत. गलवान खोऱ्यात सुरू असलेल्या डी-एस्केलेशन प्रक्रियेदरम्यान सोमवारी रात्री दोन्ही सैन्यात चकमक झाली. दोन्ही बाजूचे वरिष्ठ अधिकारी सध्या भेट घेऊन यावर चर्चा करणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून चीनचे सैनिक भारतीय हद्दीत अतिक्रमण करत होते. त्यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमकही झाली. त्यानंतर तणाव निर्माण झाल्याने तो दूर करण्यासाठी पडद्यामागून बऱ्याच हालचाली झाल्या होत्या. मात्र आज चिनी सैन्यानं पुन्हा भारतीय सैन्यावर हल्ला केला. काही वर्षांपूर्वी डोकलामचं प्रकरण घडल्यानंतर अनेक दिवस तणाव होता. त्यानंतर चीनने माघार घेतली होती. मात्र आता पुन्हा चीनचं अतिक्रमण सुरू आहे.
याआधी पूर्व लद्दाखच्या गलवान घाटी, पीपी-15 आणि हॉट स्प्रिंग्स या भागातून चिनी सैन्य मागे हटवण्यात आलं होतं. प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ चीनच्या भागात मोल्डो जवळ भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये ही चर्चा झाली होती.
सैन्याच्या हालचालींसाठी तयार केला जातोय हा मार्ग
दुसरीकडे उत्तराखंडची जोहर व्हॅली हिमालयातील एक अत्यंत दुर्गम स्थान आहे. येथील भारत-चीन सीमेजवळ मोक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या रस्त्यांच्या बांधकामांना वेग देण्यात भारताला यश आले आहे. रस्ते बांधकामात वापरल्या जाणार्याच मशीन्स हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पोहचविण्यात येत आहेत. चीनच्या धमक्या आणि दबावाला भीक न घालता भारताने या बांधकामाला जोर दिला आहे. सीमा रस्तेबांधणी संघटनेच्या (BRO) माध्यमातून चीन सीमा भागातील्या रस्त्या निमिर्तीचे काम केले जात आहे.